मुक्तपीठ टीम
कोरोनाशी दोन हात करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असलेली ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज (PMGKP) ही आरोग्यविमा योजना ३० मार्च २०२० रोजी सुरू झाली. कोरोनाच्या रुग्णाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संपर्क असणाऱ्या आणि त्यायोगे कोरोना संसर्गाचा धोका असणाऱ्या २२.१२ लाख सार्वजनिक तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्वतःसाठी ५० लाख रुपयांचे अपघाती विमा सुरक्षा कवच पुरवणे हा यामागील उद्देश आहे.
पुढील काळात अभूतपूर्व परिस्थिती उद्भवल्याने राज्य वा केंद्र रुग्णालयांच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वायत्त रुग्णालयातील, एम्स, कोरोनारुग्णांच्या विशेष उपचारांसाठी उभारलेली केंद्रीय मंत्रालयाशी संबधित राष्ट्रीय महत्वाची रुग्णालये यांच्या मागणीवरून बोलावलेले बाहेरील खाजगी रुग्णालयातील कर्मचारी/ निवृत्त/ स्वयंसेवक/स्थानिक संस्था / कंत्राटी कर्मचारी / रोजंदारी कर्मचारी / तात्पुरते कर्मचारी यांनाही या प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजच्या कक्षात आणले गेले.
या विमा योजनेची मुदत २०.१०.२०२१ रोजी संपत होती, त्यामुळे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना महामारी अजूनही आटोक्यात आलेली नाही. कोरोना कर्तव्यावर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राण गमवावे लागत असल्याची नोंद विविध राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमधून होत आहे. हे लक्षात घेऊन या विमा योजनेची मुदत २०.१०.२०२१ पासून पुढे १८० दिवस वाढवली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्यांना सुरक्षा कवच मिळेल. आतापर्यंत या योजनेंतर्गत १३५१ दाव्यांमध्ये भरपाई चुकती करण्यात आली आहे.
या संदर्भात २०.१०.२०२१ या तारखेचे पत्र सर्व राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव/ आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांना त्यांच्या संबधित राज्यांमध्ये वा केंद्रशासित प्रदेशांमधील आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये प्रसिद्धी देण्यासाठी पाठवण्यात आले आहे.