मुक्तपीठ टीम
‘प्रबोधनमधील प्रबोधनकार’ ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात ‘प्रबोधनकारांचे नातू राज ठाकरेंना निमंत्रित करा’ या आशयाचे पत्र विरोधी पक्षनेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे. तसेच या ग्रंथ या कार्यक्रमात विरोधी पक्षनेत्यांना न बोलवल्याबद्दलही नाराजी या पत्रातून व्यक्त केली आहे.
‘प्रबोधनमधील प्रबोधनकार’ या ग्रंथ प्रकल्पाबद्दल सरकारचं अभिनंदन करतो, असं शेलार यांनी म्हटलंय. मात्र, या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेत्यांना बोलावल असत तर अधिक आनंद झाला असतं. याच बरोबर प्रबोधनकारांच्या विचारांचा व्यासंग आणि वारसा असणारे राज ठाकरे यांनाही या कार्यक्रमाला बोलावून एक चांगला संदेश देता आला असता, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.
आशिष शेलार यांचं पत्र जसं आहे तसं
प्रति,
मा. उध्दवजी ठाकरे,
महाराष्ट्र राज्य.
मुख्यमंत्री
विषय “प्रबोधनमधील प्रबोधनकार” या प्रकाशनाच्या कार्यक्रमा बाबत
महोदय,
महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती महामंडळ आणि मराठी भाषा विभागातर्फे “प्रबोधन मधील प्रबोधनकार” या ग्रंथ प्रकल्पाची निर्मिती करून महाराष्ट्राच्या अमुल्य साहित्य जतनामध्ये मोठी भर पडेल असा उपक्रम हाती घेतल्याबद्दल शासनाचे आणि आपले आभार. नव्या पिढीसमोर प्रबोधनकारांचे विचार आणणे ते पोहचवणे ही काळाजी गरजच असून शासनाने हाती घेतलेल्या या उपक्रमातून महाराष्ट्राचा अनमोल ठेवा वाचकांना खुला होणार आहे याबद्दल मनस्वी आनंदच झाला. या ग्रंथाचे प्रकाशन आणि स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक संकेतस्थळाचे लोकार्पण दि. 16 ऑक्टोबरला होत असल्याचे आज शासनाने जाहीर केले आहे. प्रथेप्रमाणे या कार्यक्रमात विरोधीपक्षनेत्यांही आमंत्रित केले असते तर अधिकच आनंद झाला असता पण असो..
मला या निमित्ताने एक नम्रपणे शासनाला सुचना अथवा विनंती करावीशी वाटली त्यासाठी हा पत्रव्यवहार करीत आहे. प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा आणि व्यासंग असलेले, त्यांचे नातू मा. श्री. राज ठाकरे यांना या कार्यक्रमला राजशिष्टाचारानुसार आमंत्रित करुन एक चांगला संदेश शासनाला देता आला असता अथवा देता येऊ शकतो. अर्थात त्यांनी आमंत्रण स्वीकारावे की नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय असेल. पण ज्या ज्या वेळी त्यांना भेटलो त्या त्या वेळी त्यांच्या तोंडून प्रबोधनकारांचे जाज्वल्य विचार ऐकले आहेत. त्यावर त्यांचे असलेले नितांत प्रेम, आदर आणि व्यासंग मी अनुभवला आहे. त्यामुळे अशा व्यासपीठावर आपल्या सोबत तेही असतील तर एक संस्मरणीय सोहळा महाराष्ट्राला पाहता येईल. तसेच या कार्यक्रमात प्रबोधनकारांचे पणतू राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांसह कुटुंबातील सदस्यांचाही यथोचित सन्मान व्हावा.
एरवी महाराष्ट्राचे प्रश्न आणि राजकीय मुद्द्यांवर आपण बोलत असतोच. या कार्यक्रमाच्या बाबतीत तो अभिनिवेश मनात न ठेवता एक विनंती, सूचना अथवा मागणी करावीशी वाटली त्यासाठी केलेला हा प्रयत्न.
आपला
अॅड. आशिष शेलार