मुक्तपीठ टीम
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे एका १८ वर्षीय तरुणाला एका महिलेसोबत असलेले संबंध चांगलेच भोवले आहेत. तिच्या वडिलांनी सांगूनही त्याने ते संबध संपविण्यास नकार दिला. त्यामुळे त्याच्यावर अत्याचार करून दरीत फेकण्यात आले. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तक्रारदार ओवेस अब्दुल रहीम खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या शरिरावर जळत्या सिगारेटने चटके देण्यात आले. तसेच त्याच्या गुप्तांगावर लाथा मारल्या. एवढेच नाही तर तलवार आणि लोखंडी शिगेने मारहाण केली. त्यानंतर त्याला दरीत फेकण्यात आले. त्या तरुणाने आपला जीव वाचविण्यासाठी कसाबसा आपल्या मित्रांशी संपर्क साधला. त्यांनी त्याला वाचवले.
पोलिसांनी ३० आरोपींवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत अपहरण आणि अत्याचार केल्याच्या आरोपाखाली, शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
या प्रकरणात महिलेचे वडीलच मुख्य आरोपी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या वडीलांनी ओवेसला मुलीसोबत संबंध तोडण्याचा इशारा दिला होतो. परंतु तो मागे हटला नाही. त्यामुळेच त्याच्यावर हल्ला केला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. सध्या त्या तरुणावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.