अपेक्षा सकपाळ
मराठवाडा म्हणजे प्रतिकुलता ठरलेलीच पण त्याच रखरखाटात सृजनशीलता, बुद्धिमत्ता यांची मात्र मुबलकता नेहमीच असते. त्याचबरोबर प्रत्येकाला आपलं मानत मदत करण्याच्या संत परंपरेतून गरजूंच्या मदतीला धावणंही अनेक आपला धर्मच मानतात. बीड जिल्ह्यातील एक शिक्षिका अर्चना सानप या अशांपैकीच एक. जेव्हा गल्ली ते दिल्ली, शहर ते शिवार साऱ्यांनाच वाढदिवस दणक्यात साजरा करणं आवडतं. तिथं अर्चना सानप मात्र सामाजिक जाणीवेतून वाढदिवस साधेपणानं साजरा करत गरजूंसाठी मदतीचा हात देतात.
त्यांच्या या वाढदिवसाला तर त्या कार्यरत असणाऱ्या सहयोग सेतूच्या बीड टीमनं गरजूंना त्यांच्या हस्ते सायकल दिली. खास बाब अशी की अर्चना सानप यांच्या सोसायटीतील एका शेजारणीनं त्यासाठी खास दोन सायकली पुरवल्या. तसेच कुठेही स्वत:चा उल्लेख मात्र होऊ दिला नाही.
अर्चना सानप यांनी बीएड केले आहे. इतर हजारो शिक्षक मित्रांप्रमाणेच त्यांचाही नंबर काही सरकारी नोकरीच्या यादीत झळकला नाही. त्यामुळे त्यांनी शिकवण्याचं काम करतानाच सामाजिक क्षेत्रात वावर वाढवला. बीडमधील जनाधार प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी कोरोना संकटात मोठे काम केले. महिलांच्या संरक्षणाच्या निकडीतून आरसा फाउंडेशच्या माध्यमातून मुलींना स्वसंरक्षणासाठी धडे देण्याचे काम केले जाते.
सहयोग सेतू या संस्थेच्या टीमच्या माध्यमातून महाराष्ट्रभर काम चालतं. त्या संस्थेसाठी अर्चना आणि त्यांच्या मैत्रिणी बीडमध्ये कार्यरत आहेत. आतापर्यंत या संस्थेच्या माध्यमातून सात नवविवाहितांना संसारोपयोगी साहित्य दिलं आहे. तसेच या संस्थेने आतापर्यंत सात गरजूंना सायकली दिल्या आहेत. या वाढदिवशीही त्यांनी सायकल देऊनच वाढदिवस साजरा केला. लवकरच त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील सक्रियता वाढवणार आहेत.
त्यांच्या सामाजिक शैक्षणिक कार्याला टीम मुक्तपीठच्या शुभेच्छा!