मुक्तपीठ टीम
लखीमपूर खेरी शेतकरी हत्यांकांडात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र व मुख्य आरोपी आशिष मिश्रा यांना अटक करण्यात आली आहे. आशिष मिश्रा उर्फ मोनू यांना खून, अपघाती मृत्यू, गुन्हेगारी कट, हलगर्जीपणे ड्रायव्हिंग या कलमांखाली १२ तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. अटकेनंतर पोलिसांनी सांगितले की, आशिष मिश्रा तपासात सहकार्य करत नाहीत. त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. स्थानिक पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाईत केलेल्या दिरंगाईचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतल्याचे दिसले. त्या कालावधीत त्यांनी दहा पेनड्राइव्हमध्ये स्वत:च्या समर्थनार्थ व्हिडीओ पुरावे जमवले, शपथपत्र तयार केलीत. पण तरीही त्यामुळे पोलिसांचे समाधान झाले नाही आणि गजाआड जावेच लागले.
आशिष मिश्रा लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्यांच्या अटकेची मागणी विरोधक सातत्याने करत होते. शेतकरी नेते राकेश टिकेत यांनीही आशिषच्या अटकेची मागणी केली होती. त्यांच्या विरोधात दुसरा समन्स बजावल्यानंतर आशिष मिश्रा शनिवारी चार वकिलांसह लखीमपूर खेरी पोलीस लाईनमधील गुन्हे शाखा कार्यालयात पोहोचले होते.
शुक्रवारी नोटीस देऊनही आशिष मिश्रा पोलिसांसमोर हजर झाले नाहीत. त्यांनी त्यांची तब्येत बरी नसल्याचे कारण दिले होते.दुसऱ्या नोटीसमध्ये आशिष मिश्रा यांना पोलिसांसमोर हजर न झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता.
सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतल्यानंतर पोलीस कारवाई!
- हत्येच्या म्हणजे भादंवि ३०२ कलमाखाली गुन्ह्यात पोलीस आरोपींना चौकशीसाठी पाचारण करतात की अटक करतात, असा प्रश्न या प्रकरणी उपस्थित झाला होता.
- सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणाची दखल घेत उत्तरप्रदेश पोलिसांना जाब विचारला होता.
- त्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना जेरबंद केले.
- मंत्र्यांच्या घराबाहेर नोटिस चिकटवली.
- त्यानंतरही मंत्रीपुत्र आशिष अजय मिश्रा हे पोलिसांकडे जात नव्हते.
पोलिसांकडे जाताना स्वस्तातल्या स्कुटीवरून…
- अखेर मंत्रीपुत्र रविवारी पोलिसांकडे गेले.
- मात्र, त्यातही त्यांनी चलाखी केली. ते वेळेआधी मागील दाराने पोहचले.
- ज्याने आलिशान महागड्या गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडले, असा आरोप आहे, तोच आरोपी साध्या स्कुटीवरून ओळख पटू नये म्हणून तोंड लपवत पोलिसांकडे गेला.
- त्यांच्या चौकशीच्यावेळी पोलीस कार्यालयात भाजपाचे दोन आमदार आणि बाहेर मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी असल्याने चौकशी कशी निष्पक्ष होईल, असा संशय घेतला जात होता.
- मात्र, अखेर पोलिसांकडे मोनीने सादर केलेले व्हिडीओ पुरावे तसेच दहा शपथपत्र हे समाधानकारक नसल्याने त्याला अटक करण्यात आली