मुक्तपीठ टीम
सिंधुदुर्गातील विमानतळावरून शिवसेना आणि नारायण राणेंमध्ये (आणि त्यांच्यामुळे ते असलेल्या भाजपामध्ये) रंगलेला कलगीतुरा अवघ्या महाराष्ट्राचं मनोरंजन करणारा ठरला होता. सर्व मराठी न्यूज चॅनल्सवर दोन्ही बाजूंच्या ठराविकांच्या घेतलेल्या प्रतिक्रिया या फूल टू टाइमपास असल्यानं वारंवार चालवल्या जात होत्या. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत स्वत:चं नाव छोट्या अक्षरात लिहिले असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वत:च पत्रकारांच्या लक्षात आणून देत शिवसेनेवर कोतेपणाचा आरोप केला. त्यानंतर शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी त्यांना त्यांचे खातेच सुक्ष्म उद्योगाचे असल्याने त्यांचे नावही तसेच सुक्ष्म असा टोला मारला. त्यानंतर कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे १५ वर्षांनंतर एकाच मंचावर आले आणि स्वाभाविकच पुन्हा टोलेबाजी रंगली. आता राज्य सरकारच्या प्रसिद्धी विभागाने जारी केलेली प्रेसनोटही निमंत्रण पत्रिकेप्रमाणेच बहुधा केंद्रीय मंत्री नारायण राणेंना खटकणारी असू शकते. कारण त्या १३१६ शब्दांच्या त्या प्रेसनोटमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी फक्त २६ शब्द आहेत. त्यांच्यापेक्षा नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना बरे म्हणजे ४८ शब्द स्थान आहे. माध्यमक्षेत्रातील जाणकारांच्या मते ही चूक आहे असे नाही. कोणत्याही राज्य सरकारच्या प्रसिद्धी विभागावर राज्य सरकारमधील नेत्यांच्या प्रसिद्धीचे प्राथमिक जबाबदारी असते. त्यामुळे ते त्या नेत्यांनाच महत्व देणं स्वाभाविकच आहे. मात्र, निमंत्रण पत्रिकेतील नावाच्या ‘सुक्ष्म’ आकाराला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर आता सरकारी बातमीतील ‘सुक्ष्म’ स्थानही त्यांना खटकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्य सरकारची प्रेसनोट जशी आहे तशी:
सिंधुदुर्ग विमानतळाचे लोकार्पण
कोकणच्या विकासाने भरारी घेतली,
कोकणची संपन्नता जगासमोर येणार
आजपासून सुरू झालेल्या सिंधुदुर्ग विमानतळामुळे कोकणवासियांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. खऱ्या अर्थाने कोकणच्या विकासाने आजपासून भरारी घेतली आहे. जगभरातील पर्यटक कोकणात येतील आणि कोकणची संपन्नता जगासमोर येणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
नागरी विमान वाहतूक मंत्रालय, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने उड्डाण प्रादेशिक संपर्कता योजनेंतर्गत ग्रीनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते, दिल्ली येथून ऑनलाईन सहभागी झालेल्या नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, कृषी मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार अरविंद सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, आमदार निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, दीपक केसरकर, वैभव नाईक, नितेश राणे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत यांनी विमानतळावर आगमन झाल्यावर मुख्यमंत्र्यांसह उपस्थित मंत्री यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर कोनशिला अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून कोकणवासियांचे स्वप्न पूर्ण झाले, याचा आनंद झाला आहे. या विमानतळामुळे जगभरच्या पर्यटकांबरोबरच उद्योजकही मोठ्या प्रमाणात येऊन आर्थिक विकासाला चालना मिळेल. कोकणचे वैभव मोठे आहे. गोव्यापेक्षाही इथले समुद्र किनारे स्वच्छ, सुंदर आहेत. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. इथल्या स्थानिक उद्योजकांना, आंबा, काजू, फणस तसेच मासे निर्यातीला प्रोत्साहन व चालना मिळेल. या विमानतळाच्या निमित्ताने कोकणचे सौंदर्य जगासमोर जाणार असून येथील निसर्ग सौंदर्य आणि मातीचा सुगंध जगातील पर्यटकाला आकर्षित करेल.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विमानतळांचा विकास करण्याच्या दृष्टीने शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले असून सिंधुदुर्ग विमानतळ आंतरराष्ट्रीय होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. येथे विमानबरोबरच हेलिकॉप्टर सेवा ही सुरू झाल्यास पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेता येईल. शासनाने पर्यटनाला प्रोत्साहन व गती मिळण्यासाठी उद्योगाचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे उद्योजकांनाही या भूमीत चांगली संधी आहे. लवकरच मुंबई -गोवा महामार्गाचे काम तसेच राज्यातील अन्य महामार्गाची कामे सुरु करण्यात येणार आहेत, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी कोकणवासियांना शुभेच्छा दिल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोकणवासियांचे खूप दिवसांचे स्वप्न होते. या विमानतळाच्या उभारणीत अनेकांचे योगदान आहे. कोकणाला निसर्गाचे वरदान लाभले असून कोकणचे सौंदर्य पाहता सेथील पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीकोनातून हे विमानतळ महत्वपूर्ण ठरणार आहे. जगातून पर्यटक यावेत, तरुणांना रोजगार मिळावा, त्यातून आर्थिक सुबत्ता नांदावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आपण होत आहोत, पुढच्या उज्ज्वल समृद्ध भविष्यकाळाची सुरुवात होत आहे. पर्यटनाची खूप मोठी संधी असून नव्या युगाची सुरुवात आज होत आहे. या शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या विमानतळावरील येथून पुढची उड्डाणे ही फुल्ल असतील. एमआयडीसीने विमानतळासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा केल्या, याचा मला आनंद आहे. कोकणवासियांची स्वप्ने साकार होतील, असे यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई म्हणाले.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, जगाला कोकण दाखवू शकतो. कोकण जगप्रसिद्ध आहेच. जगाला आजपासून दरवाजे खुले झालेत, पर्यटक कसे येतील, पर्यटन आणताना पर्यावरण कसे राखले जाईल, याची जबाबदारी आम्ही घेत आहोत.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, या विमानतळामुळे जगभरातील पर्यटक इथे येतील आणि इथल्या लोकांना रोजगार मिळेल.
केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे म्हणाले, अतिशय आनंदाचा क्षण आहे. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जिल्ह्यात पर्यटनाला उभारी मिळेल, इथल्या लोकांना रोजगार मिळेल.
अध्यक्षीय भाषणात नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, सिंधुदुर्गची भूमी ही केसरीया आहे. नव्या इतिहासाला सुरुवात झाली. कोकण, आंबा, फणस, मासे यांचे उद्योग देशात प्रसिद्ध होतील. इथलं सौंदर्य, भौगोलिकता, इतिहास विश्वात पोहचवता येईल. पुढच्या पाच वर्षात २०-२५ फ्लाईट सुरू झाले पाहिजेत. त्यासाठी माझा विभाग निश्चित काम करेल.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. मुख्यमंत्री ठाकरे यांना आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री सिंधिया यांना पहिला बोर्डींग पास वितरित केला. सिंधुदुर्ग येथून मुंबईला जाणाऱ्या विमानाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झेंडा दाखवण्यात आला.
खासदार विनायक राऊत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर पालकमंत्री उदय सामंत यांनी सर्वांचे आभार मानले. या सोहळ्यास मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलीस महासंचालक संजय पांडे, प्रधान सचिव (विमानचालन) वल्सा नायर- सिंह, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अन्बलगन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, आयआरबीचे व्यवस्थापकीय संचालक विरेंद्र म्हैसकर आदी उपस्थित होते.