मुक्तपीठ टीम
कोरोनात वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर जन्माला आलेल्या गौरी गिरी या दोन महिन्यांच्या मुलीसाठी हेरंब कुलकर्णी यांनी सोशल मिडियात आवाहन केले. अवघ्या एका पोस्टमुळे महाराष्ट्रातून दीड लाख रुपये जमले. त्या रकमेची किसान विकासपत्रात गुंतवणूक करून गावाच्या साक्षीने गौरीची आई आश्विनी तिच्याकडे भावपूर्ण वातावरणात पासबुक सुपूर्त करण्यात आले. तांभोळ येथ गावकऱ्यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून हे किसान विकास पत्र अश्विनीकडे सुपूर्त करून महाराष्ट्रातील मदत केलेल्या देणगीदारांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
शिवचरण गिरी यांच्या पत्नी अश्विनी यांना गावच्या महिला सरपंच अनुराधा चव्हाण यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, पत्रकार शांताराम गजे, हेरंब कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हे आज प्रदान करण्यात आले. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन दिवसात इतकी मोठी रक्कम ज्या मुलीला, गावाला कोणी बघितले ही नाही अशा मुलीसाठी इतकी मदत गोळा झाली याबद्दल सर्वांनीच कौतुक व्यक्त केले.
कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे कार्यकर्ते मनोज गायकवाड ललित छल्लारे, रोहिणी कोळपकर, भाऊसाहेब वाकचौरे, संगीता साळवे, सुनील शेळके,जालिंदर बोडके,हेमंत दराडे हे उपस्थित होते.
मंगेश कराळे यांनी सर्वांचे स्वागत केले व कार्यक्रमामागील भावना व्यक्त केली. याप्रसंगी बोलताना जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी कोरोना विधवासाठी अकोल्यातून सुरू झालेली ही चळवळ आता महाराष्ट्रभर पसरते आहे व या प्रश्नावर सरकारही धोरणात्मक निर्णय या चळवळीमुळे घेते आहे. त्यातून सर्वच विधवा महिलांना दीर्घकालीन लाभ होतील असे सांगितले व साडीचोळी देऊन त्यांनी अश्विनी चा सन्मान केला.
पत्रकार शांताराम गजे यांनी प्रत्येकवेळी सरकारवर अवलंबून राहण्यापेक्षा समाजानेच समाजातील वंचितांना आधार देण्याचे, पुनर्वसन करण्याचे काम करायला हवे. समाजानेच या कुटुंबाची जबाबदारी घेतली असे जर गावोगावी घडले तर या महिलांचा जगण्यावर विश्वास नक्कीच वाढेल.
हेरंब कुलकर्णी यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून ही मदत कशी गोळा झाली याची सविस्तर माहिती देऊन समाज बिघडला आहे असंवेदनशील झाला आहे असे बोलताना समाजातील हा चांगुलपणा ही अजून जिवंत आहे ही कार्यकर्त्यांना उमेद देणारी घटना आहे केवळ एका फेसबुक पोस्टवरून इतकी रक्कम जमा होते ही समाजातील सद्भावना हेच आशास्थान आहे असे सांगितले.
गावकऱ्यांच्या वतीने वाल्मीक नवले बाळासाहेब मांडे यांनी मनोगत व्यक्त करून शिवचरण यांची भावजय पुष्पा गिरी यांनी कष्टातून जमा केलेले चार लाख रुपये आजाराच्या काळात शिवचरण साठी दिल्याचे कृतज्ञतेने सांगितले. त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष सरपंच अनुराधा चव्हाण यांनी अश्विनी गिरी व गावातील अशा सर्वच विधवा महिलांच्या पाठीशी ग्रामपंचायत सर्व अडचणीच्या प्रसंगी ठामपणे उभी राहील असे सांगितले. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांनी आपल्या गावातील जन्माला आलेल्या मुली साठी इतकी मोठी रक्कम दिली याने गावकरी भारावून गेले व त्या सर्वांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली जमलेली दीड लाख रुपयांची रक्कम हेरंब कुलकर्णी यांनी किसान विकास पत्र च्या माध्यमातून दाम दुप्पट योजनेत दहा वर्षासाठी गुंतवली आहे ती या मुलीच्या शिक्षणासाठी उपयोगी पडेल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिनाथ चव्हाण यांनी तर सुत्रसंचलन प्रा. विलास भांगरे यांनी केले.यावेळी अण्णासाहेब कराळे, उपसरपंच सुखदेव कडाळे, सदस्य सुदाम नवले,जयश्री जाधव,जैनुद्दीन शेख, गिरी कुटुंबीय उपस्थित होते.