मुक्तपीठ टीम
आज प्रजासत्ताक दिन सोहळा संपल्यावर जे घडलं ते वेगळंच. राष्ट्रध्वजाला वंदन केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निघाले तेवढ्यात त्यांचे लक्ष एका व्यक्तीकडे गेले. ते थांबले, मागे वळले आणि त्यांनी त्या व्यक्तीची आवर्जून विचारपूस केली. मुख्यमंत्री ठाकरे ज्याच्यासाठी मागे वळून आले ती व्यक्ती १०३वर्षांची स्वातंत्र्यसैनिक आहे. मुख्यमंत्री ठाकरेंच्या आपुलकीच्या वागण्यानं ते मनापासून खूश झाले, त्यांनी तोंड भरून आशीर्वाद दिला.
आज शिवाजी पार्क येथे राष्ट्रध्वजवंदन कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले १०३ वर्षांचे स्वातंत्र्य सैनिक आहेत सत्यबोध सिंगीत. त्यांना पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या जवळ गेले आणि त्यांची विचारपूस केली.
श्री सत्यबोध यांच्यासमवेत त्यांचा मुलगा आणि सून देखील होते. खुद्द मुख्यमंत्री आस्थेने चौकशी करताहेत म्हटल्यावर श्री सत्यबोध सिंगीत यांनी आनंद व्यक्त करून आशीर्वाद दिला. यावेळी श्रीमती रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या.
आज मुख्य कार्यक्रम संपल्यावर राज्यपाल व इतर मान्यवर परत जाण्यासाठी प्रवेशद्वारावर उभे होते. त्यांना निरोप देऊन मुख्यमंत्री अचानक आतमध्ये वळले आणि स्वातंत्र्य सैनिक कक्षाकडे गेले , तेथील वयोवृद्ध अभ्यागतांची अधिक विचारपूस करणे आवश्यक आहे म्हणून मुख्यमंत्री परत भेटीस आले.