प्रा. हरी नरके / व्हा अभिव्यक्त!
साध्वी सावित्रीबाई फुले उद्यान हे नाव ३० वर्षांपूर्वी दिले गेले. ते बदलण्याची मागणी करणे चुकीचे नाही, मात्र त्याची एक पद्धत आहे. आधी महापालिकेकडे तसं पत्र देऊन त्याचा पाठपुरावा केला असता, आणि त्यानंतर जर मनपा नाव बदलायला तयार झाली नसती तर मग समाजमाध्यमावर आवाज उठवणं अधिक योग्य ठरले असते.
ज्यांनी १९९१ साली हे नाव दिले त्यांना त्यागी, निस्वार्थी वृत्तीने काम करणाऱ्या सावित्रीबाई अभिप्रेत होत्या. त्याकाळात क्रांतीज्योती वा ज्ञानज्योती हे शब्द फारसे प्रचलितही नव्हते.
ज्यांनी उद्यानाला हे नाव दिले त्यांचा हेतू चांगला होता. मी त्यांना व्यक्तीशः ओळखतो. सावित्रीबाईंवरील आदरापोटीच साध्वी हा शब्द वापरला गेला. तेव्हाचे सांस्कृतिक संदर्भ नी हा ठराव देणाऱ्या भल्या लोकांचा सदहेतू महत्वाचा आहे. त्यांचा आदर ठेवूनच बदलाची मागणी करायला हवी. जेव्हा सावित्रीबाईंना बहुतेक सगळे लोक विसरले होते तेव्हा त्यांचे स्मरण कायम ठेवणारे हे लोक आहेत हे विसरू नका.
आज ‘साध्वी’ या शब्दाला विपरीत अर्थ प्राप्त झालेला असला तरी तेव्हा तो तसा नव्हता.
शिवाय पारंपरिक शब्द टाळण्याइतके बहुजन तेव्हा काटेकोर नव्हते, जागरूक वा दक्ष नव्हते. त्यांचे सांस्कृतिक भान तेव्हाही आजागृत होते नी आजही आहे. पण म्हणून त्यांची कृती कमी महत्वाची ठरत नाही.
या शब्दाला विरोध करणारे मात्र अज्ञानातून सापसाप म्हणत भुई धोपटत सुटलेत.
दुसरी बाजू समजून न घेता हेत्वारोप करणे, जजमेंटल होणे टाळता येणार नाही काय? निव्वळ शाब्दिक आग्रहापोटी प्रतिकांच्या या लढाईत आपण आपल्याच पूर्वसूरींना दुसऱ्या छावणीत ढकलून टाकायचे काय?