डॉ.जितेंद्र आव्हाड
तो या ‘तांबड्या माती’तला ‘सोंगाड्या’ होता. तो ‘पांडू’ होता, ‘गंगाराम’ होता. ‘एकटा जीव’ तर तो कायमचाच होता; पण ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’ करण्याचे अनोखे कसब होते त्यांच्या अंगात. मराठी ‘मास’चा तो ‘दादा’ होता. आणि म्हणूनच मराठीतील लक्षावधी प्रेक्षकांशी त्याचे ‘जमले’ होते. त्यांचे नाव होते श्रीकृष्ण ऊर्फ दादा खंडेराव कोंडके.
ते खऱ्या अर्थाने गिरणगावातील चाळसंस्कृतीचे अपत्य होते. गिरणगावातील हा कामगार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला. त्यातही प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातून. मुंबईत तो आला, धावत्या धोट्यावर त्याचे आयुष्य धावू लागले; पण गावाकडची माती आणि त्या मातीची संस्कृती तो विसरला नव्हता. या शहराला त्याने त्या मातीचा गंध दिला. सण, उत्सव, जत्रा-यात्रा, तमाशा, कीर्तन, अभंग, भारूड, ओव्या, लोकगीते यांतून वाहणारा संस्कृतीचा प्रवाह या वस्त्यांनीही वाहता ठेवला होता. दादा कोंडके नावाच्या या शाहीर, लेखक, ‘लोकनाट्य तमासगीर’, अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक, निर्मात्याचे मन याच संस्कारांतून घडलेले होते.
नायगाव-भोईवाडा यांसारख्या कामगार विभागातच ते लहानाचे मोठे झाले. वडील, चुलते नायगावच्या ‘स्प्रिंग मिल’मध्ये नोकरीला. दोघेही चांगल्या हुद्द्यावर. मिलला लागूनच असलेल्या स्प्रिंग मिल कम्पाउंडमधील चाळींत त्यांच्या खोल्या होत्या. वडील माळकरी. ज्ञानेश्वरी मुखोद्गत होती त्यांना. घरी तिचे पारायण होत असे. हरिभक्तपरायण मंडळींचे घरी येणे-जाणे असे. घराबाहेरच्या वातावरणातही कलेची हवा होतीच. दादांना लहानपणीच संगीताचा लळा लागला होता. त्यामुळे एका बॅन्ड पथकात ते सामीलही झाले होते. शाळेत असतानाच कविता वगैरेही करायचे ते. निबंधलेखनात अव्वल असायचे वर्गात आणि स्वभाव जात्याच खोडकर, मस्तीखोर. तीच मस्ती, तोच खोडकरपणा, तोच हजरजबाबीपणा पुढे त्यांच्या मदतीला आला. या कामगारवस्तीने त्यांना राजकीय भानही दिले होते. त्यांचे चित्रपट भलेही रूढ अर्थाने राजकीय नव्हते; पण त्यांत सामान्य, दुबळ्या माणसाचे ‘पॉलिटिक्स’ नक्कीच होते.
सत्तर-ऐंशीच्या दशकात सामाजिक निरागसतेचा बळी गेलेला होता. स्वार्थ जीवनभाव आणि हिंसा हे वास्तव बनत चालले होते. अमिताभ बच्चन हा त्या हिंसा, संतापाचे प्रतीक बनलेला होता. दादा मात्र त्याच्या दुसऱ्या टोकाला होते. ते समाजाची निरागसता, लहान मूलपणा एकीकडे जपत होते. द्वयर्थी संवाद, गाण्यांतून ते एक वेगळाच खेळ खेळत होते. त्यातील अश्लीलता दादांच्या नायकाच्या संवादात नसे; ती प्रेक्षकांच्या मनात असे आणि ते त्यांना माहीत असे. समाजाच्या मनातील लैंगिकता दादा वेशीवर टांगत होते. ज्यांना त्याची जाणीव नव्हती फारशी, ते त्याला खळाळून हसत होते; ज्यांना होती ते दादांना टाळत होते. बावळट म्हणून हिणवली जाणारी, समाजाच्या दृष्टीने मागास असलेली माणसेही जिंकू शकतात हे दादा प्रेक्षकांना दाखवत होते. वेळोवेळी उच्चभ्रू समाजाच्या दांभिकतेची पिसे काढत होते. त्याची गरज होती आणि ती दादांना बहुधा त्या चाळसंस्कृतीनेच दाखवून दिली असावी.
“अपना बाजार’मध्ये ६० रुपये पगारावर काम करणारे दादा सेवा दलाच्या कला पथकात कविवर्य वसंत बापट, शाहीर लीलाधर हेगडे यांच्या संपर्कात आले. निळू फुले, राम नगरकर हे त्यांचे तेव्हाचे मित्र पुढे लवकरच त्यांनी स्वतःचे कला पथक स्थापन केले. वसंत सबनीस यांचे ‘विच्छा माझी पुरी करा’ हे लोकनाट्य त्यांनी रंगमंचावर आणले आणि त्याने महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ घातला. या लोकनाट्याच्या माध्यमातून त्यांनी खरा सोंगाड्या कसा असतो, तो कसे भाष्य करतो, दंभस्फोट करतो, हे मराठी माणसाला दाखवले, या त्यांच्या लोकप्रियतेतून त्यांना चित्रपटसृष्टीचे दरवाजे खुले झाले. भालजी पेंढारकर यांनी त्यांना ‘तांबडी माती’ (१९६९) या चित्रपटात संधी दिली. दोनच वर्षांनी ते स्वतः निर्माते बनले. त्यांचा पहिला चित्रपट होता तो ‘सोंगाड्या’. तो आला, लोकांनी तो पाहिला आणि त्याने
लोकांना जिंकले…त्यानंतर दादा चित्रपट आणत राहिले आणि लोक ते डोक्यावर घेत राहिले. कधी शेतकरी, कधी धोबी, कधी हवालदार…साध्या माणसांच्या भूमिका ते साकारत होते. हा नक्कीच गिरणगावच्या चाळसंस्कृतीतून आलेला साधेपणा होता. त्या माणसांचे विचार, संस्कार त्यांच्या चित्रपटातून दिसत होते. ज्या लोकांत दादा जन्मले, त्या लोकांनी दादांवर भरभरून
प्रेम केलेच; पण दादांनीही त्या लोकांचे, त्या गिरणगावाचे, तेथील चाळींचे ऋण आपल्या १६ चित्रपटांतून, गाण्यातून फेडले…
(लेखक डॉ. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत.)
मखमली सुरांचा सम्राट मोहम्मद रफी: चाळीच्या खोलीतून सुरुवात…रसिकांच्या मनावर राज्य!