डॉ.जितेंद्र आव्हाड
रोजीचा रोटीचा सवाल रोजचाच आहे
कधी फाटका बाहेर कधी फाटका आत आहे
कामगार आहे मी तळपती तलवार आहे
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे
सरस्वतीच्या पुत्रांना, बुद्धिमंतांना आव्हान देत कामगारांचे जगणे, सोसणे, लढणे आपल्या शब्दांत मांडणारे, ‘सूर्यफुलाचे कवी’ नारायण सुर्वे हे खऱ्या अर्थाने या मुंबईचे, गिरणगावाचे, चाळीचे सुपुत्र. ते जन्माला आले अनाथ म्हणून. कुणा अभागी मातेने स्वतःपासून अलग केलेले हे अर्भक एका कामगारमातेने आपल्या छातीशी घेतले. गंगाराम कुशाजी सुर्वे या कामगारपित्याने त्याला छत दिले. गंगाराम सुर्वे हे ‘इंडिया वूलन’ मिलमध्ये स्पिनिंग खात्यात साचेवाले म्हणून काम करीत. आई काशीबाई ‘कमला’ मिलमध्ये बाईंडिंग खात्यात होती. परळच्या जेरबाई वाडिया रुग्णालयाजवळच्या बोगदा चाळीत (आताची बामणदेव सहकारी गृहनिर्माण संस्था) त्यांचे घर होते. तेथेच ते लहानाचे मोठे झाले. त्याच वातावरणाचे संस्कार घेऊन वाढले. दसऱ्याच्य् आदल्या दिवशी गिरणी कामगार यंत्रांची पूजा करीत असत. छान आरास करायचे. सगळे खाते शृंगारायचे. नारायण सुर्वे सांगतात, ‘माझी आई त्या दिवशी आम्हा दोघांना, म्हणजे मला आणि सखूला कडेवर उचलून नेई. माझ्या अंगावर तेव्हा नवा शर्ट असे आणि डोक्यावर जरीची टोपी. थोडा वेळ तिच्या खात्यात; तर नंतर बराचसा वेळ वडील काम करीत त्या गिरणीतील खात्यात. अगदी लहानपणीच स्पिनिंग, रोव्हींग, भुलेर, कपडा खाते, बाईंडिंग खात्याशी माझा परिचय होत होता. मी घडवला जात होतो.’ या कामगारांच्या मुंबईला त्यांनी ‘माझे विद्यापीठ’, असे म्हटले आहे.
‘माझे विद्यापीठ’ या कवितेची रचना बोगदा चाळीतीलच. प्रा. केशव मेश्राम हे त्यांचे मित्र. ते पेन्सच्या शेजारील बैठ्या चाळीत राहत. एका रात्री सेनापती बापट मार्गावरील पालिकेच्या दिव्याखाली बसवून सुर्वे यांनी मेश्राम यांना ही कविता वाचून दाखवली. त्यासोबतच ‘सत्य’ नावाची आणखी एक कविताही त्यांनी ऐकवली. त्या दोन्ही कविता प्रा. मेश्राम यांना इतक्या आवडल्या, की त्या त्यांनी सत्यकथेचे संपादक प्रा. राम पटवर्धन यांना दाखवल्या. आणि सुर्वे यांच्या कवितांना सत्यकथेचे, मौजेचे दरवाजे खुले झाले. ‘ माझे विद्यापीठ’ त्या वर्षीच्या सत्यकथेत; तर ‘सत्य’ ही मौजेच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली. महाराष्ट्र साहित्य-शारदेला गिरणगावातील या कवीचे दर्शन झाले.
कधी शहराच्या रस्त्यावर
झेंड्याचे झुलवित सागर
आम्ही काढितो भव्य जुलूस
सौख्याचे सजविण्या उरूस
बगलेत धुरांडे दाबून
राजमुद्रा त्यावर ठोकून
रणपंडित लढतो आम्ही
बलवानच ठरतो आम्ही
अशा गाजेत रोज धुमाळी
अमुची दुनियाच निराळी
या वेगळ्या दुनियेचे रूपरंग लेवून आलेली सुर्वेंची कविता. ती जगण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या हरेक श्रमिकांचे वेदनागीत गात होती. स्वातंत्र्य-समतेचा जाहीरनामा मांडत होती. कलेसाठी कला की जीवनासाठी कला, असा वाद महाराष्ट्रात खेळला जात होता आणि सुर्वे गात होते –
छानसे घरकुल नांदते गुलमोहराखाली
केवळ कांकणे किणकिणली असती.
रोजच आला असता चंद्र खिडकीत
नक्षत्रांपलीकडची एक दुनिया असती.
भरल्या पोटाने अगा पाहातो जर चंद्र
आम्हीही कुणाची याद केली असती.
मुंबईतीलच नव्हे, तर अवघ्या दुनियेतील श्रमिकविश्वाचे गाणे गाणाऱ्या या कवितेला महाराष्ट्रानेही डोक्यावर घेतले. ऐसा गा मी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, नव्या माणसाचे आगमन हे त्यांचे काव्यसंग्रह. या कवितांचे हिंदी, इंग्रजीत अनुवाद झाले. त्यांच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद ‘ऑन द पेव्हमेन्ट्स ऑफ लाईफ’ या नावाने प्रसिद्ध झाला. विविध मान-सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आले. चाळीत वाढलेल्या या कवीचा, कामगारपुत्राचा, शिक्षकाचा १९९८ मध्ये केंद्र सरकारनेही पद्मश्री प्रदान करून गौरव केला. १६ ऑगस्ट २०१० रोजी ठाणे येथे या गिरणगावच्या सुपुत्राचे निधन झाले.
(लेखक डॉ. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत.)