मुक्तपीठ टीम
आपल्याकडे एअर अँब्युलन्स म्हणजेच हवाई रुग्णवाहिका अद्याप तेवढ्या जास्त प्रमाणात प्रचलित नाहीत. त्यामुळे लोकांच्या परिचयातही नाहीत. मात्र, पाश्चात्य देशांमध्ये अशा रुग्णवाहिका कधीही, कुठेही आणि कशाही मदतीला धावतात…नव्हे उडतात! ताजं उदाहरण एका क्रिकेटच्या मैदानातील आहे. तिथं सामना नुकताच सुरू झाला होता. यादरम्यान एक अजब घटना घडली आहे. पहिल्या षटकाचा खेळ सुरू होता. तेवढ्यात अचानक घरघराटाचा आवाज आला, त्यामुळे सर्वांचे डोळे वरच्या दिशेने वळले. आकाशातून हेलिकॉप्टर रुग्णवाहिका जमिनीच्या अगदी वर हवेतून जमिनीवर उतरत होती. लगेच सर्व खेळाडूंनी तिला जागा करून दिली. ती उतरली आणि रुग्णही सुरक्षित पोहचला.
इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट चॅम्पियनशिप दरम्यान ब्रिस्टल मैदानावर एक सामना सुरु होता. ग्लॉस्टरशायर आणि डरहम यांच्यात चार दिवस हा सामना खेळला जात होता. सामना सुरू झाला. पहिले षटक सुरू असतानाच, सामनाधिकाऱ्यांकडे एक बातमी आली. ही माहिती आश्चर्यचकित करणारी होती. हेलिकॉप्टर जमिनीवर उतरणार असल्याने सामना थांबवावा लागला, अशी माहिती मिळाली. जसे हेलिकॉप्टर खाली आले. खेळाडू शांतपणे मैदान सोडून बाहेर पडले.
ही एक एअर अॅम्ब्युलन्स होती, ज्याचा उद्देश आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रदान करणे आहे. जेव्हा सामना थांबवण्यात आला, तेव्हा एक रुग्ण जीवन आणि मृत्यूच्या परिस्थितीशी झुंज देत होता. मिळालेल्या माहितीनुसार, टीमला बातमी मिळाली होती की ब्रिस्टलच्या परिसरात कोणालातरी डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, ज्याला त्वरित उपचारांची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या मैदानापेक्षा आसपासच्या परिसरात हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी दुसरी चांगली जागा नव्हती.
एअर अॅम्ब्युलन्स सर्व्हिसने संपूर्ण घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “क्रिकेटच्या मैदानावर या सर्वांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि आमच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे उतरण्यासाठी आणि गरजू रुग्णाला प्रतिसाद देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद.” त्यानंतर लवकरच स्पर्धा सुरू झाली.