मुक्तपीठ टीम
जगात कोणी नसेल तेवढा कोकणी माणूस आपल्या गावाच्या प्रेमात असतो. तसेच निसर्गप्रेमीही निसर्गाचं वैभव मुक्तहस्ते बहरलेल्या कोकणाच्या प्रेमात पडतोच पडतो. आता मुंबईची तळकोकणातील चाकरमानी आणि जगभरातील पर्यटकांना कोकणात जाण्यासाठी विमानाची सोय झाली आहे. येणार…येणार म्हणून दीर्घ काळ वाट पाहिल्यानंतर आता अखेर विमानाने जाण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या ९ ऑक्टोबरपासून एअरलाईन्स कंपनी अलायन्स एअर मुंबई ते सिंधुदुर्ग उड्डाण सुरू करणार आहे. हा प्रवास २ हजार ५२० रुपयात करता येणार आहे. ही सेवा केंद्र सरकारद्वारे संचालित प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत सुरू केली जात आहे.
सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाशी जगाला पहिल्यांदा जोडणार अलायन्स एअर!
- अलायन्स एअर ही एअर इंडियाची प्रादेशिक उड्डाण उपकंपनी आहे.
- अलायन्स एअरने बुधवारी सांगितले की ते ९ ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग उड्डाणे सुरू करणार आहे.
- उड्डाण सुरू झाल्यानंतर अलायन्स एअर ही देशातील पहिली देशांतर्गत वाहक असेल जी कोकण विभागातील चिपी या ग्रीनफिल्ड विमानतळावरून उड्डाणे सुरू करेल.
- ग्रीनफिल्ड विमानतळाला व्यावसायिक कामकाज सुरू करण्यासाठी विमान सुरक्षा नियामक असणाऱ्या डीजीसीएकडून गेल्या आठवड्यात विमानतळ परवाना मिळाला.
- अलायन्स एअर आपले ७० आसनी ATR ७२-६०० विमान मुंबई आणि सिंधुदुर्ग दरम्यान उड्डाणांसाठी तैनात करेल.
- या विमानतळाचे उद्घाटन विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
देशात सर्वत्र हवाई संपर्कासाठी खास योजना
- देशातील हवाई उड्डाणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशांतर्गत हवाई प्रवास सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने प्रादेशिक जोडणी योजना सुरू केली आहे.
- याअंतर्गत देशाच्या छोट्या विमानतळांवरून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.
- उड्डाणांची संख्या कमी असू शकते, परंतु लोकांना हवाई सेवेचा लाभ मिळत आहे.
- केंद्र सरकारचे लक्ष संपूर्ण देशाला हवाई नेटवर्कशी जोडणे हे आहे.
- या दिशेने प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना सुरू करण्यात आली आहे.
किती रुपयात पोहचणार कोकणात?
- सुरुवातीला सर्व करांसह अलायन्स एअरचे तिकीट किंमत मुंबई-सिंधुदुर्गसाठी २,५२० रुपये ठेवण्यात आली आहे.
- सिंधुदुर्ग-मुंबई विमानाचे भाडे २,६२१ रुपये निश्चित करण्यात आले आहे.