मुक्तपीठ टीम
आयपीएलमधील चीअरलीडर्स म्हणजे अनेकांच्या आकर्षणाचे केंद्र. खेळाडूंमध्ये त्या किती जोष भरतात माहिती नाही, पण तिथे त्या उत्सवी वातावरणनिर्मितीत नक्कीच उपयोगी ठरतात. मात्र, आता त्या तालिबान्यांच्या डोळ्यात खुपल्या आणि त्यामुळे आयपीएलही त्यांच्या डोक्यात गेले आहे. त्यांनी अफगानिस्तानमध्ये आयपीएलवर बंदी घातली आहे.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १४ व्या सीझनचा दुसरा टप्पा यूएईमध्ये सुरू झाला आहे. आयपीएल भारतासह जगभरात लोकप्रिय आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून क्रिकेटपटू आयपीएल मध्ये आपली प्रतिभा दाखवत असतात. दरवर्षी प्रमाणे त्याचे थेट प्रक्षेपण जवळजवळ प्रत्येक देशात चालू आहे. पण याच दरम्यान अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा नवीन हुकूम जारी करण्यात आला आहे. अफगाणिस्तान मध्ये आयपीएल बॅन करण्यात आले आहे. तालिबान्यांनी हे जाहीर केले आहे. आयपीएल इस्लामविरोधी आहे, चीअरलीडर्स सामना सुरु असताना डान्स करतात, तसेच महिला केस न झाकता सामना पाहायला येतात या गोष्टींवर आक्षेप घेऊन तालिबान्यांनी अफगाणिस्थानात आयपीएल बॅन केले आहे.
अफगाणिस्तानमध्ये मनोरंजनाच्या मर्यादा
- अफगाणिस्तानमध्ये आता तालिबानचे राज्य आहे, त्यामुळे त्यांच्या सर्व आदेशांचे पालन करणे बंधनकारक आहे.
- मनोरंजनाच्या बहुतेक साधनांना अफगाणिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली आहे.
- आयपीएलही त्याला अपवाद नाही.
- एकीकडे तालीबान क्रिकेटचे एम्बॅसीटर असल्याचा दावा करते.
- तर दुसरीकडे आयपीएल बॅन.
- आयपीएल सामन्यांदरम्यान चीअर लीडर्स नाचतात, महिला केस न झाकता सामने बघायला येतात, हे सर्व इस्लामच्या विरोधात आहे.
- असे मत तालिबान्यांनी व्यक्त केले आहे.
- याच कारणांमुळे अफगाणिस्थान मध्ये आयपीएल बॅन करण्यात आले आहे.
अफगाणिस्तानमध्ये महिलांची स्थिती भयावह
- अफगाणिस्तानमधील महिला यापुढे कोणत्याही प्रकारचे खेळ खेळू शकणार नाहीत.
- पुरुषांवर कोणतेही निर्बंध नाहीत.
- अफगाणिस्तानचे नवे क्रीडा महासंचालक बशीर अहमद रुस्तमझाई यांना जेव्हा विचारण्यात आले की भविष्यात महिला कधीच कोणत्याही खेळात सहभागी होऊ शकतील का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले नाही.
- अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे भवितव्यही बंदुकीच्या बळावर झालेल्या सत्ता बदलामुळे धोक्यात आले आहे.