मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र राज्य माहिती आयोगात राज्य माहिती आयुक्त म्हणून डॉ. सुरेशचंद्र गैरोला, समीर सहाय, आणि राहुल भालचंद्र पांडे या तिघांची नेमणूक करण्याची अधिसूचना काढण्यात आली. या तिघांच्या नावांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मान्यता दिली असून राज्यपालांच्या स्वाक्षरीने ही अधिसूचना 16 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली.
सुरेशचंद्र गैरोला हे भारतीय वन सेवेचे महाराष्ट्र केडरचे सेवानिवृत्त अधिकारी असून भारतीय वन संशोधन आणि शिक्षण परिषदेचे महासंचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
समीर सहाय हे भारतीय वन सेवेतील निवृत्त अधिकारी असून त्यांनी यापूर्वी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनचे अतिरिक्त निवासी आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. तसेच वन खात्यात कार्यरत असताना त्यांनी मराठवाड्यात रोजगार हमी योजना व वन तलावाच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेले आहे.
राहुल भालचंद्र पांडे हे वरिष्ठ पत्रकार असून ते कायद्याचे पदवीधर आहेत. त्यांनी राज्यशास्त्रातील पदव्युत्तर पदवीही संपादन केली आहे.
राहुल पांडे माहिती आयुक्तपदी नियुक्ती झालेले विदर्भातील पहिलेच पत्रकार
मध्य भारतातील सर्वात मोठे इंग्रजी वृत्तपत्र द हितवादचे शहर संपादक राहुल पांडे यांची माहिती आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. विदर्भातील माहिती आयुक्त म्हणून निवड झालेले पांडे हे पहिलेच पत्रकार आहे. 48 वर्षीय पांडे ह्यांनी पोलिटिकल सायन्समध्ये एम ए केले असून त्यांनी एलएलबी ही पूर्ण केले आहे.
पांडे यांचा पत्रकार म्हणून ही आरटीआय कायद्याचा अभ्यास दांडगा आहे. त्यांनी असंख्य आरटीआयवर आधारित बातम्या तर केल्या आहेतच, पण तसेच आरटीआयचा योग्य वापर करून ही असंख्य प्रकरणं उघडकीस आणली आहेत. सार्वजनिक हिताच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी केलेल्या वार्तांकनामुळे हाय कोर्टाने त्या विषयांना जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कोर्टाने वार्तांकनाची दखल घेतलेला राहुल पांडे हा एकमेव पत्रकार असेल.
त्यांच्या राजकीय अभ्यास आणि आकलनामुळे अनेक वेळा वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक न्यूज चॅनेल्सवर ही चर्चा सत्रांमध्ये त्यांना बोलावले जाते.
त्यांनी नुकतेच नितीन गडकरी ह्यांच्या webinars वर आधारित अनमासकिंग इंडिया नावाचे पुस्तक ही संपादित केले आहे.