मुक्तपीठ टीम
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने शिक्षक दिनी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांचा सत्कार केला. कोकणातील पाचही जिल्ह्यांमध्ये शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी आणि चिपळूण पूरग्रस्तांसाठी केलेल्या मदतीबद्दल हा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना निलेश सांबरे यांनी कोकण विकासासाठी स्थानिक विद्यार्थ्यांना घडवून प्रत्येक जिल्ह्यातून आयएएस अधिकारी तयार करण्याचे महत्व मांडले. ते म्हणाले, “कोकणात नैसर्गिक संपत्ती आहे तशीच बुद्धिमत्ताही आहे. शिक्षक सक्षम असतील तर ते सक्षम विद्यार्थी घडवतील आणि मग त्यांना आणि कोकणाला पुढे जाण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही”.
जिजाऊचे संस्थापक निलेश सांबरे यांनी आपल्या भाषणात कोकणाच्या शैक्षणिक आणि आरोग्य विषयक विकास घडवण्याच्या मुद्द्यावर जास्त भर दिला. ते म्हणाले, “गेले सात-आठ वर्षे कोकणातील कोणत्याही जिल्ह्यातील, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचण न येता तो शिकला पाहिजे, हे जिजाऊ संस्थेचं पहिलं कर्तव्य आहे”.
स्थानिक वास्तव मांडत ते म्हणाले की, “कोकण हा शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात मागेच आहे. कमी पडतो. एखाद दुसरा नायरसाहेबांसारखा, आमच्याकडे हेमंता पाटील आयएएस झालेला पाहायला मिळतो. माझं तर स्वप्न आहे की कोकणातील पाचही जिल्ह्यातून दर वर्षी एक तरी आयएएस अधिकारी तयार झाला पाहिजे. हे चित्र बदलावं लागेल. त्यासाठी आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधून आयएएस अधिकारी तयार झाले पाहिजेत. असे अधिकारी चित्र बदलू शकते. त्यासाठीच जिजाऊ कोकणातील मुलांना आयएएस परीक्षेसाठी तयार करण्याचे काम करते आहे. पालघरच्या तलासरीपासून सिंधुदुर्गमधील गोवा सीमेपर्यंत स्पर्धा परीक्षांसाठी ३४ वाचनालय चालवले जातात. सावंतवाडीलाही आहे. तसेच स्पर्धा परीक्षांसाठी निवासी प्रशिक्षणाची व्यवस्थाही केली आहे. कणकवलीतही पोलीस अॅकडमी सुरु केली होती” त्याचीही माहिती त्यांनी दिली”.
कोकण विकासाचं स्वप्न साकारण्याची गरज मांडताना ते म्हणाले की, “कोकणातील शिक्षकांनी प्रामाणिकपणे चांगलं काम केलं तर हे चित्र बदलू शकेल. शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये, कोरोना संकटातही कोकणातील शिक्षकांनी चांगले काम केले. मला वाटतं, आपण जे स्वप्न पाहिलं आहे ते पूर्ण होण्यात काही अडचण आहे”.
शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचं महत्व मांडताना ते म्हणाले, “आपण आईच्या पोटात असतानाच आईकडून शिक्षण घेतो. त्यानंतर घडत जातो. मी पालघर जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष शिक्षण समिती सभापती असताना शिक्षणासाठी खास काम केले. नंदलालसाहेबांच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन शिक्षक तयार केले. जर आपले शिक्षक सक्षम तयार झाले तर आपले विद्यार्थी चांगले तयार होतात. विद्यार्थी पुढे गेले तर आपल्याला पुढे जाण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. कोकणात नैसर्गिक संपत्ती आहे तशीच बुद्धिमत्ताही आहे. आपल्याकडे नायर साहेब आहेत, डायरेक्ट आयएएस असले तर काय काम होते, ते दिसते. लवकरच दिसेल. त्यांच्याजोडीला संजनाताई आहेत, इतर सभापती महोदय आहेत. सर्व मिळून खूप काम होईल”.
भाषणाचा शेवट करताना त्यांनी सभागृहातील सिंधुदुर्गवासीय लोकप्रतिनिधींना दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या, “आपल्या कोकणातील एकही विद्यार्थी शिक्षणाविना राहू नये, यासाठी तसा कोणीही अडचणीतील विद्यार्थी असला तर जिजाऊ मदत करेल. लवकरच इथे एक शववाहिनी जिजाऊच्यावतीने देत आहो. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काही महिन्यातच तीन रुग्णवाहिकाही देणार आहोत”.
जिजाऊच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
चिपळूण पूरग्रस्तांना मदत केलेल्या जिजाऊच्या कार्याची दखल घेऊन रत्नागिरी जिल्ह्याधिकारी यांनी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे समस्त रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने आभार मानले होते त्याचवेळी रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षक संघटनेमार्फत चिपळूण मध्ये केलेल्या कार्यालयाबद्दल अभिनंदन ही करण्यात आले .
जिजाऊच्या कार्याची खास दखल
आज शिक्षण दिनाचे औचित्य साधत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत संस्थेचे संस्थापक निलेशजी भगवान सांबरे यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज सभागृह , जि प सिंधुदुर्ग येथे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.संजना संदेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळेस सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर , महिला व बालकल्याण सभापती सौ.शर्वानी गावकर , समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण , माजी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई, पंचायत समिती कुडाळ सभापती सौ.आयर मॅडम, शिक्षणाधिकारी आंबोकर, जिल्हा परिषद सद्यस्य व संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हातील शिक्षक वर्ग उपस्थित होते.