मुक्तपीठ टीम
ब्राम्हण समाजाला शैक्षणिक आणि रोजगार क्षेत्रात आरक्षण मिळावे यासाठी ‘समस्त ब्राम्हण समाज संघर्ष समिती’ने शुक्रवारी औरंगाबादेत आंदोलन केले. ताम्हण-पळी बजाव आंदोलनात महिलाही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. आंदोलनकांनी ब्राह्मणांना जातीयदृष्ट्या हिणवले जात असल्याने अॅट्रोसिटी कायद्यासारखे संरक्षणही मिळावे, अशीही मागणी केली.
आमच्यावर ताम्हण-पळी वाजवण्याची वेळ सरकारने आणली आहे. इतरांना काही न मागता मिळतं. आम्ही मागूनही मिळत नाही. संघर्ष केल्याशिवाय आम्हाला काहीच मिळत नाही. सर्वांना सर्व मिळाले. ब्राह्मणांना मात्र शुन्यावरच ठेवले आहे. मात्र, जोपर्यंत ब्राह्मण कुणाला साथ देत नाही तोपर्यंत कुणालाच किंमत नाही, असे आंदोलकांनी स्पष्ट शब्दात बजावले.
ब्राह्मण समाजाच्या मागण्या
-
ब्राह्मण समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात शैक्षणिक, नोकरीत आरक्षण द्यावे
-
ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, एक हजार कोटींची तरतुद करावी
-
ब्राह्मण समाजाला हिणवणाऱ्यांवर अॅट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई व्हावी
-
ब्राह्मण समाजाच्या मुलींबद्दल समाजमाध्यमात गैरउद्गार काढणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी
-
ब्राह्मण समाजासाठी वसतीगृह स्थापन करावे
-
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार द्यावा
-
पुरोहितांना मासिक पाच हजार मानधन द्यावे
-
केजी ते पीजी मोफत शिक्षण द्यावे
-
ब्राह्मण समाजाचे आर्थक सर्वेक्षण व्हावे
-
ब्राह्मण समाजाच्या कुळ कायद्यात गेलेल्या जमिनी परत मिळाव्यात
आंदोलनादरम्यान समितीच्या महिला सदस्यांनी देखील त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या अशी मागणी केली आहे.
समिती सदस्य विजया कुलकर्णी म्हणाल्या की, “ ब्राह्मण समाजासोबत नेहमीच भेदभाव होतो. भारतात मुलांना संधी मिळत नसल्यामुळे आमच्या मुलांना परदेशात जाण्यास भाग पडत आहेत. त्यांच्या कौशल्याचा फायदा घेत इतर देश पुढे जात आहेत आणि आपला देश मागे राहिला आहे. सगळ्या भारतात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ब्राह्मण एक होत आहेत. १०० टक्के रिझल्ट देणारे लोक आहोत आम्ही. त्यामुळे आमच्या मागण्या मान्य कराव्यात.”
जयश्री चौबे म्हणाल्या की,“ब्राह्मण समाजाने पायाभूत सुविधांसाठी इतरांचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला असे कधी झाले नाही, परंतु तरीही ब्राह्मण समाजाकडे दुर्लक्ष केले जात आहे. आम्ही इतरांसारखे नाही जे त्यांच्या मागण्यांसाठी दबाव आणतात मालमत्तेचे नुकसान करतात. आम्ही कुठलाही उपद्रव करत नाहीत. सर्व समाजांना सर्व मिळतं. आता सर्व करतात तसंच ब्राह्मणही एकत्र येऊन आपला आवाज उठवू शकतो. इतरांसारखा उपद्रव करत नाही. संपत्तीचा नाश करत नाही.”
उज्वला पैठणे म्हणाल्या, “आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार आरक्षण हवे आहे, जेणेकरून कोणत्याही क्षेत्रात आम्ही मागे राहाणार नाही. नोकरी-शिक्षणात आरक्षण मिळावे. आमच्या मुलींची बदनामी होऊ नये. जे जातीनुसार शेंडी, पळी असे हिणवतात त्यांच्यावर अॅट्रोसिटीची कारवाई व्हावी.”
आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची औरंगाबादमधील राजकीय नेत्यांनी भेट घेतली. त्यात शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, भाजपचे अतुल सावे यांचा समावेश होता.
कमेंटमध्ये आपलं मत नक्की मांडा.
#व्हाअभिव्यक्त या कॅटेगरीत आपण आपले मत जे असेल ते सरळस्पष्ट मांडू शकता. अट एकच कोणाच्या भावना दुखावणारे नसावे. मेल करा muktpeethteam@gmail.com व्हॉट्सअॅप, टेलीग्राम करा 701148070