मुक्तपीठ टीम
भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेले पत्र सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. शिवसेनेच्या वर्तुळातही या पत्रातील तक्रारींकडे योग्य मुद्दा म्हणून पाहिले जात आहे. महापालिकेतील नोकरशहांनी मुंबई मनपाच्या ललित कला प्रतिष्ठानच्या अधिपत्याखाली मुलुंडमधील क्रीडा संकुलाचा तरण तलाव आणि अंधेरीतील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलातील जलतरण तलाव आणि बॅडमिंटन कोर्टाच्या खासगीकरणाचा डाव केल्याचा आरोप राणे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून डाव उधळला नाही तर आंदोलनाचा इशाराही आमदार राणे यांनी दिला आहे.
आमदार नितेश राणेंच्या पत्रात काय?
- नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून मुंबई मनपाच्या क्रीडा संकुलांच्या खासगीकरणाकडे लक्ष वेधले आहे.
- मुंबई मनपाच्या ललित कला प्रतिष्ठानच्या अधिपत्याखाली मुलुंडमधील क्रीडा संकुलाचा तरण तलाव आणि अंधेरीतील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलाचा कारभार आहे. प्रतिष्ठानची स्थापना केल्यानंतर यात पारदर्शकता राहावी म्हणून यावर महापालिकेचे नियंत्रण असावे असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वाटले होते.
- त्यामुळे त्यांनी या प्रतिष्ठानचे अध्यक्ष महापौर आणि उपाध्यक्ष महापालिका आयुक्त असतील अशी तजवीज करून ठेवली.
- यात सदस्य म्हणून कला व क्रीडा क्षेत्रातील मान्यवर घेतले.
यामागे बाळासाहेबाचा हेतू स्पष्ट व स्वच्छ कारभाराचा व्हावा असा होता. टपरंतु, आता मात्र तसे राहिले नाही, असं राणे यांनी सांगितलं.
खासगीकरणामागे कुणाचा इंटरेस्ट?
- या प्रतिष्ठानवर विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) देवेंद्रकुमार जैन नियुक्त झाल्या झाल्याच स्विमिंग पूल आणि बॅडमिंटन कोर्टच्या खासगीकरणाचा घाट घातला जात आहे.
- देवेंद्र कुमार जैन हे महापौरांचेही ओएसडी आहेत.
- याचा अर्थ स्पष्ट आहे की, महापौरांचा इंटरेस्ट असल्याशिवाय या खासगीकरणाचे पाऊल उचलणे शक्य नाही.
- जैन हे कुणाच्या निर्देशावरून सामान्य मुंबईकरांच्या हक्काचा जलतरण तलाव आणि बॅडमिंटन कोर्ट विकायला निघाले आहेत आणि ते कुणाच्या घशात घालायचे आहेत हेही अगोदरच ठरले असल्याची चर्चा आहे, असेही आमदार राणे यांनी म्हटलं आहे.
कर्मचाऱ्यांवरही बेरोजगारीचा धोका
- ललित कला प्रतिष्ठाणकडून मागवण्यात आलेले अभिरुची स्वारस्य अर्ज फक्त दिखावा आहे.
- एकदा खासगीकरण झाले की यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उद्ध्वस्त केले जाणार हे स्पष्ट आहे.
- त्यातील निम्मे लोक हे बाळासाहेबांचे सैनिक आहेत.
- मुळात या दोन्ही संकुलातून मिळणारा पैसा प्रतिष्ठानच्या तिजोरीत जमा होतो.
- तरण तलावाच्या नुतनीकरणाचे काम महापालिकेच्या निधीतून होते आणि देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी प्रतिष्ठानकडे आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
- जर हे धोरण बदलण्यात आले नाही तर कर्मचाऱ्यांसह रस्त्यावर उतरण्याचा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.