मुक्तपीठ टीम
गेल्या तीन महिन्यांपासून पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीच्या सभापतीपदावरून राज्यातील आघाडीच्या घटक पक्षांमध्ये सुरु असलेला सामना शिवसेनेला हरवत राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकला आहे. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंनी खेड पंचायत समितीतील शिवसेनेचे सदस्य फोडल्याची थेट मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी गंभीर दखल घेतली होती. तेव्हा शिवसेना खासदार संजय राऊतांनी तेव्हा मोहितेंना थेट आव्हानही दिलं होतं. मात्र, अखेर मंगळवारी सभापतीपदाची निवडणूक पार पडली. शिवसेनेकडे बहुमत असतानाही आमदार मोहितेंनी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा पराभव करून दाखवला आहे! त्यांच्या प्रयत्नांमुळे सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण चौधरी यांची निवड झाली आहे. त्यामुळे स्थानिक शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
- खेड पंचायत समितीत शिवसेनेची सत्ता होती.
- शिवसेना ८, राष्ट्रवादी ४, कॉंग्रेस -१, भाजप -१ असे बलाबल होते.
- पण शिवसेनेत अंतर्गत नाराजी होती, तिचा राष्ट्रवादीनं फायदा उचलला.
- खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय १४ पैकी ११ जणांच्या वतीने अविश्वास ठराव दाखल केला गेला होता.
- शिवसेनेच्या सदस्यांना पाच सदस्यांना १४ पैकी ११ सदस्यांची मोट बांधली गेली.
- शिवसेनेतील ही बंडखोरी आमदार दिलीप मोहितेंनी घडवल्याच्या तक्रारीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीशी चांगले संबंध असणाऱ्या खासदार संजय राऊतांवर खेडची जबाबदारी सोपवली होती.
संजय राऊतांच्या इशाऱ्याला दिलीप मोहितेंनी भिक घातली नाही!
- फोडाफोडीचा हा विषय राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत नेला जाईल, पण हे राजकारण घाणेरडं आहे.
- पंचायत समितीचा विषय आमच्यासाठी संपलाय. आम्हीही माणसं फोडू शकतो.
- पण आम्ही नियमांनी बांधल्यामुळे ते करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे आमची शरद पवारांवरही श्रद्धा आहे, आम्ही त्यांच्यापर्यंत आधी जाऊ, त्यानंतर आम्ही काय करायचं के पाहू.
- दिलीप मोहिते यांची वागणूक अशीच असेल, तर महाविकास आघाडी असो की नसो, इथे शिवसेनेचा उमेदवार असेल आणि आताचे दिलीप मोहिते यांना पाडून शिवसेनेचे आमदार निवडून येतील, अशा इशाराचं संजय राऊतांनी दिला होता.
- पण आता आमदार दिलीप मोहितेंना राष्ट्रवादी नेतृत्वाने काहीच सांगितले नसावे आणि त्यांनीही त्या बळावर खासदार राऊतांच्या इशाऱ्याला भिक घातलेली दिसत नाही.
- त्यामुळेच बहुमतातील शिवसेनेला हात चोळत बसवत त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला आहे.
ज्योती अरगडेचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आवाहन
- ज्योती अरगडे यांनी सभापती निवडणुकीनंतर तीव्र संताप व्यक्त केलाय.
- त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केलं आहे की, ‘शिवसैनिकांवरील अन्यायाला वाचा फोडा.
- अन्यथा शिवसेना हे नाव संपून जाईल आणि शिवसेनेवरील लोकांचा विश्वास उडेल’.