मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील मंदिर प्रवेशासाठी भाजपा आता आक्रमक झाली आहे. आज राज्यभर भाजपाने आक्रमक आंदोलन केले. राज्य सरकारने दारुची दुकाने, पब ही मद्यालय उघडते पण देवालय मात्र का बंद ठेवते, असा सवाल भाजपाने ठाकरे सरकारला विचारला आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. मुंबई, पुणे, पंढरपूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूरमध्ये भाजपाकडून निदर्शन सुरु आहेत.
मुंबई
आमदार राम कदम यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेते आणि कार्यकर्ते सिद्धिविनायक मंदिरासमोर जमले होते. कोरोनामुळे, गर्दी जमा करण्यास मनाई आहे, परंतु असे असूनही, भाजपा कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलन केले.
विलेपार्ले पश्चिममधील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेश मेहता, नगरसेविका सुनिता मेहता यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी मंदिर प्रवेशाचा हक्क बजावला.
पुणे
पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शंखनाद आंदोलनात सुरु आहे. मी इशारा देतो आज दिवसभरात मंदिर उघडा. नियम करून का होईना मंदिरं उघडली नाही तर आजपासून लोक त्यांच्या भावना काबूत ठेवणार नाहीत. ते मंदिरांचे कुलुपं तोडून मंदिरात घुसतील. “उद्धवजी होश मे आओ, होश मे आकर बात करो”, महाराष्ट्रातील पाच पंचवीस लाख लोकं असतील ते देव मानत नाहीत. पण मंदिर सुरू न करता इतरांचे शाप तुम्ही घ्याल. आज संध्याकाळपर्यंत मंदिर सुरू करा, असं आवाहन पाटील यांनी केलं.
पंढरपूर
पंढरपुरात भाजपा कार्यकर्त्यांनी नामदेव पायरीजवळील भिंत ओलांडून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यात भाजपाच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.
शिर्डी
भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात कोल्हार भगवतीपूर येथे भगवतीमाता मंदिरासमोर आंदोलन केलं. मंदिर उघडण्यासाठी भाजप आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.
नाशिक
नाशिक येथील गोदावरी नदीच्या काठावर रामकुंड येथे भाजपाचे नेते तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. राज्य सरकार हे कंसाप्रमाणे असून धर्माला दडपण्याचा प्रयत्न करत आहेत आता मंदिर उघडलं नाबी तर राज्भर तांडव होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
कोल्हापूर
अंबाबाई मंदिराजवळ भाजपानं हे आंदोलन केलं. यावेळी शंखनाद करत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
तुळजापूर
भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. तुळजाभवानी मंदिरा समोर आज भाजपाच्या वतीने शंखनाद आंदोलन केले. मुख्य महाद्वार, शहाजी महाद्वारासमोर भाजपने काळी गुढी उभारली होती.
सोलापुर
भाजप आमदार माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत आंदोलन पार पडले. मल्लिकार्जुन मंदिरासमोर भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. टाळ मृदंग आणि हातात पोस्टर घेऊन सरकारचा निषेध यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. राज्यात बार सुरू आहेत, मात्र भक्त परमेश्वराच्या दर्शनाला आसूसलेले असताना मंदिर उघडे केले जात नाहीयेत. शिवसेनेने हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला ठेवला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने हिंदुत्वाचा मुद्दा गुंडाळायचा अशी अट ठेवल्याने शिवसेना मंदिर उघडत नाहीये अशी टीका आमदार सुभाष देशमुख यांनी केली. विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी भाजपच्या ५० हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.