मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचल्या का, या योजनांचा लाभ मिळताना जनतेला कोणत्या अडचणी आल्या हे जाणून घेणे हा जन आशीर्वाद यात्रेचा उद्देश आहे. याकडे राजकारण अथवा भाजपा म्हणून न पाहता समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचून त्यांच्या सूचना ऐकून घेण्यासाठी यात्रा आहे, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी जालना येथे पत्रकार परिषदेत सांगितले. रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे हेही यावेळी उपस्थित होते.
या यात्रेच्या माध्यमातून केंद्राच्या वेगवेगळ्या योजनांची माहितीही जनतेस देण्यात आली. तसेच लाभार्थी व अन्य समाज घटकांचे प्रश्न जाणून घेण्यात आले, असे डॉ. कराड यांनी सांगितले.
गंगाखेड येथे पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या एका लाभार्थी शेतकऱ्याने पंतप्रधान मोदी यांना भेट देण्यासाठी लाल फेटा आपल्याकडे दिला, तर लोहा येथे मुस्लिम समाजाच्या महिलेने तलाक विरोधी कायदा केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे भाषणात जाहीर आभार मानले. मोदी सरकारच्या अनेक निर्णयाचे कौतुक होत आहे. तर मुद्रा योजना, पीक कर्ज, पीक विमा मिळत नाही अशा तक्रारीही काहीनी केल्या. या संदर्भात येत्या २७ तारखेला मुंबईत आपण सर्व बँक अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक घेणार आहोत, अशी माहिती डॉ. कराड यांनी दिली.
पत्रकार परिषदेला जिल्हा अध्यक्ष आ.संतोष दानवे, नारायण कुचे, यात्रा समन्वयक मनोज पांगारकर, सह समन्वयक प्रवीण घुगे, माजी आमदार विलास खरात, ज्येष्ठ नेते भास्कर दानवे, प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी, शहराध्यक्ष राजेश राऊत आदी उपस्थित होते.
शहरातील उद्योजक, व्यापारी, डॉक्टर, वकील, प्राध्यापक आणि विविध सामाजिक, सांस्कृतिक संस्था व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दानवे आणि डॉ.कराड यांना विविध विषयांबाबत निवेदने सादर केली.