मुक्तपीठ टीम
बोगस कागदपत्रांच्या आधारे काही नामांकित बँकेसह नॉनबँकिंग फायनान्स कंपनीतून कोट्यवधी रुपयांचे गृहकर्ज घेऊन फसवणुक करणार्या एका टोळीचा वाशी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. श्रीधर नरोला, सत्येन यशवंत पांचाळ ऊर्फ संजय सुनिल सावंत, हितेश वेद ऊर्फ संजय सुनिल सावंत आणि पवन सिन्हा ऊर्फ अजय शेट्टी अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
चारही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अनेक फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. श्रीधर नरोला हा उच्चशिक्षित असून संगणक तंज्ञ आहे, याच ज्ञानाचा वापर करुन त्याने बोगस कागदपत्रे बनविली होती, या टोळीचा तोच मुख्य आरोपी असून त्याच्याविरुद्ध कस्तुरबा मार्ग, चेंबूर पोलीस ठाण्यात तीन, सत्येन पांचाळ याने संजय सावंत या नावाने स्वतचे खाते उघडून फ्लॅटचा विक्रीचा करारनामा केला होता, त्याच्याविरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात एक गुन्हा, हितेश वेद याने संजय सावंत या नावाने स्वतच्या नावाने बँकेतून कर्ज घेतले आहे. त्याच्याविरुद्ध मिरारोड, बोरिवली पोलीस ठाण्यात चार गुन्हे, पवन सिन्हा हा मूळ फ्लॅट मालकाच्या ऐवजी तोतया फ्लॅट मालक म्हणून उभा राहून बोगस बँक खाते उघडून फसवणुकीची रक्कम प्राप्त केली आहे, त्याच्याविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात एक फसवणुकीचा गुन्हा नोंद असल्याचे सांगण्यात आले.
मुंबई, नवी मुंबई परिसरात विविध बँका आणि नॉनबँकिग फायानान्स कंपनीतून मोठ्या प्रमाणात गृहकर्ज दिले जातात, गृहकर्ज देण्याच्या प्रक्रियेत अनेकदा बँकांकडून काही त्रुटी ठेवल्या जातात, त्याच काहीजण गैरफायदा घेतात, यातील तक्रारदार कुनाल सुनिल शहा हे अंधेरी परिसरात राहत असून त्यांच्या बजाज फायानान्स कंपनीतून गृहकर्ज घेतले होते, मात्र गृहकर्जाची रक्कम मिळाल्यानंतर त्यांची फसवणुक झाली होती, सुमारे ५२ लाख रुपयांची फसवणुक झाल्यानंतर त्यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती, या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, सहपोलीस आयुक्त डॉ. जय जाधव, पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ, पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, सचिन ढगे, पोलीस हवालदार शैलेश कदम, पोलीस नाईक संजय सावंत, दिनेश निकम, पोलीस शिपाई गोकुळ ठाकरे, प्रशांत ठाकूर, केशव उगळे, समीर यादव यांनी तपासाला सुरुवात केली होती, तपासात आरोपींनी बोगस कागदपत्रे बनवून खोटा व्यवसाय असल्याचे दाखवून घर आणि दुकान भाडेतत्त्वावर घेत, त्या आधारे या आरोपींनी विविध बँकेत खाते उघडले होते. ते घर आणि दुकान स्वतच्या मालकीचे असल्याचे सांगून त्याची नंतर ही टोळी विक्री करीत होती, त्यासाठी बँकेचे गृहकर्ज काढून फसवणुक करीत होते. सुरुवातीचे हप्ते भरल्यानंतर ही टोळी पळून जात होती.
बँकेत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी मिरारोड येथून या टोळीचा मुख्य आरोपी श्रीधर नरोला याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तपासात श्रीधर हा बोगस कागदपत्रे बनवून तसेच रहिवाशी पुराव्याची कागदपत्रे सादर करुन विविध शोरुममधून महागडे वस्तू, बाईक फायानान्स कंपनीकडून विकत घेऊन त्याची परस्पर विक्री करीत होता. त्यांनी अशाच प्रकारे एक बाईक खरेदी केली होती, ही बाईक पोलिसांनी जप्त केली आहे. त्याच्या चौकशीत इतर तीन आरोपींची नावे समोर आले होते, त्यानंतर या तिघांनाही पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून अटक केली. तपासात अशा प्रकारे फसवणुक करणारी एक सराईत टोळी आहे. या टोळीने बोगस कागदपत्रांच्या आधारे अनेक बँकांना गंडा घातला होता, दुकान आणि घराचे बोगस कागदपत्रे बनवून त्याची विक्री करताना बँकेतून गृहकर्ज घेतले, गृहकर्जाची रक्कम मिळाल्यानंतर ही टोळी एक दोन हप्ते भरल्यानंतर पळून जात होती. या टोळीने मुंबईसह नवी मुंबईत अशा प्रकारे अनेक गुन्हे केले आहे. याच गुन्ह्यांत ते चौघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.