मुक्तपीठ टीम
पुरामुळे उध्वस्त झालेल्या कोकणातील रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी केंद्र सरकारच्यावतीने देण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली.
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांची केलेल्या दौऱ्याची व तेथील पूरस्थितीची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिली. अनेक भागातील रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले आहेत, त्यामुळे सर्व रस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी आज दिल्लीमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना सविस्तर निवेदन दिले. कोकणातील उध्दवस्त झालेल्या रस्त्यांसाठी निधी देण्याची विनंती गडकरी यांच्याकडे केल्याचे दरेकर यांनी सांगितले. यावेळी गडकरी यांनी ही विनंती मान्य करीत कोकणासाठी केंद्र सरकारच्यावतीने १०० कोटींचा निधी देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. गडकरी यांच्या या सहकार्यामुळे कोकणवासियांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली.