मुक्तपीठ टीम
जुलमी, अत्याचारी इंग्रज सरकारला आजच्या दिवशी ९ ऑगस्ट १९४२ साली ऑगस्ट क्रांती मैदानातून ‘चले जाव’चा नारा दिला गेला आणि देशभर हे आंदोलन उभे राहिले. ‘चले जाव’च्या आंदोलनाने इंग्रज सत्तेला हादरा बसला आणि शेवटी १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र होऊन देशात लोकशाही व्यवस्था आली. या स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान आहे. परंतु स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे योगदान नाही त्या विचारसणीचे लोक आज सत्तेत असून मोठ्या कष्टाने मिळवलेले स्वातंत्र्य व लोकशाही व्यवस्था मोडीत काढण्याचे काम सध्या करत आहेत. ही लोकशाही व्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून सर्वांनी एकत्र येऊन लोकशाही वाचवण्याच्या लढाईत सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
ऑगस्ट क्रांती मैदानात काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात नाना पटोले बोलत होते. ते पुढे म्हणाले की, देशातील वंचित, शोषित, बहुजन समाजाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पाच हजार वर्ष संघर्ष करावा लागला. मोठ्या संघर्षानंतर स्वातंत्र्याची पहाट देशात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने या वंचित समाजाला मुख्य प्रवाहात आणले. लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून देशाची प्रगती होत असताना मागील काही वर्षात ही सर्व व्यवस्था मोडीत काढण्याचे काम सुरु आहे. २०१४ पासून देशाला ग्रहण लागले आहे. शेतकरी, तरुण, व्यापारी वर्गाला खोटी स्वप्ने दाखवून सत्तेत आले आणि संविधान व्यवस्था बदलण्याचे काम केले जात आहे. देश बलशाही बनवण्यासाठी वाटचाल सुरु असताना ते स्वप्न धुळीस मिळवण्याचे काम सध्याचे केंद्रातील सरकार करत आहे. लोकशाहीच्या चारही स्तंभाचे स्वातंत्र्य आज धोक्यात आहे. लोकशाही व्यवस्था वाचवायची वेळ आली आहे त्यासाठी देशातील सर्व नागरिकांनी या लढाईत सहभागी झाले पाहिजे.
यावेळी बोलताना विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याची सुरुवात ऑगस्ट क्रांती मैदानातून झाली होती. महात्मा गांधी यांनी इंग्रजांना ‘चले जाव’चा नारा दिला आणि त्यानंतर हे आंदोलन देशभर पसरले आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले परंतु आज ती व्यवस्था मोडीत काढण्याचे काम केले जात आहे. आता आपल्याला देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी देश व लोकशाही व्यवस्था वाचवायची गरज आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले की, आजचा दिवस हा भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरलेला दिवस आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसौनिकांनी झोकून देऊन लढा दिला. त्यांच्या निर्धारानेच आपल्याला आजचा हा दिवस पहायला मिळत आहे. देशासाठी त्यावेळी असलेली मुल्ये व तत्वे यांची तुलना करता आज त्या मुल्ल्यांना, तत्वांना तिलांजली दिली जात आहे. लोकशाही धोक्यात आहे, आज ज्या पद्धतीने कारभार सुरु आहे तो काय कामाचा, आता खरी लोकशाही पुन्हा प्रस्थापित करण्याचे आव्हान आपल्यापुढे येऊन ठेपले आहे.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यावेळी म्हणाले की, याच मैदानातून १९४२ साली महात्मा गांधींनी अन्यायाच्या विरोधात आवाज दिला होता. याच मैदानातून जुलमी इंग्रज राजवटीला ‘चले जाव’चा नारा दिला होता. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात आज पुन्हा एकदा अन्यायाविरोधात आवाज बुलंद करण्याची वेळ आली आहे. त्यावेळी इंग्रजांविरोधात ‘चले जाव’चा नारा दिला होता आज देशातील मोदी सरकारचा अन्याय व अत्याचार पाहता ‘भाजपा चले जाव’चा नारा देण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात वर्षभर विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत, असेही जगताप म्हणाले.
ऑगस्ट क्रांतिदिनी मुंबईतील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्मांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक व स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संविधान व देश वाचवण्यासाठी शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हुसेल दलवाई, झिशान सिद्दीकी, बाबा सिद्दीकी, मधू चव्हाण, जेनेट डिसुझा, हुस्नबानो खलिफे, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, व्यर्थ न हो बलिदान अभियानाचे समन्वयक व प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, विनायक देशमुख, सेवादलाचे सतिश मनचंदा, देवानंद पवार आदी उपस्थित होते.