मुक्तपीठ टीम
शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. स्वाभाविकच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. शुभेच्छांच्या या वर्षावात शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनातील पहिल्या पानावरील जाहिरात चर्चेचा विषय ठरली आहे.
निवडणुकीच्यावेळी तेजस ठाकरे नगरमध्ये मंचावर दिसल्यानंतर उद्धव ठाकरेंनी तो जंगलात रमणारा असून फक्त सभा पाहायला आल्याचे सांगत राजकारण प्रवेशाचा इंकार केला होता. मात्र, तरीही जाहिरातीमुळे पुन्हा एकदा नव्या ठाकरेंच्या राजकारण प्रवेशाची चर्चाही सुरु झाली आहे. तेजस ठाकरेंचं कौतुक करताना शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंनी ‘तोडफोड सेना’ उल्लेख केला होता. त्याची आठवण देत, त्यामुळे तेजस ठाकरेंचे पॉलिटिकल लाँचिंग झाले तर शिवसेनेत आदित्य ठाकरेंची संयमी शैली आणि तेजस ठाकरेंची आक्रमकता असा अनोखा संगम पाहण्यास मिळेल, असं म्हटलं जात आहे.
दैनिक सामनात ही जाहिरात शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी दिली आहे. त्या जाहिरातीत त्यांनी “ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस् तेजस उद्धव ठाकरे यांना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” असं म्हटलं आहे. तेजस ठाकरे हे वन्यजीवप्रेमी संशोधक आहेत. त्यांनी आजवर अनेक नव्या दुर्मिळ वन्यजीवांचा शोध लावला. त्यामुळे क्रिकेटशी थेट संबंध नसतानाही त्यांची व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी तुलना केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
आदित्य ठाकरेंच्या संयमी शैलीला तेजस ठाकरेंच्या आक्रमकतेची जोड मिळणार?
- युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या लाँचिगदरम्यान बाळासाहेब ठाकरे यांनी तेजसचे कौतुक केलं होतं.
- “तेजसची तोडफोड सेना आहे. त्याची स्टाईल माझ्यासारखी, छंद माझ्याशी जुळणारे, वन्यजीवन त्याला खूप आवडते,”
- या शब्दांमध्ये शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी कौतुक केले होते.
- तेजस ठाकरे हे घरात आक्रमक असल्याने त्यांचं कौतुक करताना बाळासाहेब ठाकरे ‘तोडफोड सेना’ म्हणाले होते.
- त्यामुळे तेजस ठाकरेंचे पॉलिटिकल लाँचिंग झाले तर शिवसेनेत आदित्य ठाकरेंची संयमी शैली आणि तेजस ठाकरेंची आक्रमकता असा अनोखा संगम पाहण्यास मिळेल.
वडिलांसारखाच जंगलात रमणारा पण संशोधक वृत्तीचा तरुण!
- त्यांचा मोठा भाऊ आदित्य ठाकरे यांच्या निवडणुकीच्यावेळी ते तेथे दिसले होते, मात्र, तेजस ठाकरे अद्याप सक्रीय राजकारणात उतरलेले नाहीत.
- उद्धव ठाकरेंप्रमाणेच तेजस ठाकरेही जंगलात रमतात.
- वडिलांना वन्यजीवांचे छायाचित्रण कमालीचे आवडते.
- ते खूप चांगले वन्यजीव छायाचित्रकार म्हणूनही नावाजले जातात.
- तेजसची आवड मात्र वन्यजीव संशोधनाची आहे.
- तेजस ठाकरे यांनी खेकड्यांच्या नव्या प्रजाती शोधून काढल्या आहेत.
- यातील एका प्रजातीला त्यांनी ठाकरे नाव दिलं आहे.
- त्यांनी गेल्यावर्षी पालीच्या दुर्मिळ प्रजातीचा शोध लावला होता.
पश्चिम घाटातील जैवविविधतेतेच्या माहितीत त्यांच्या संशोधनामुळे मोलाची भर
- तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर, इशान अग्रवाल आणि सौनक पाल या चार संशोधकांनी २०१४ मध्ये या पालींच्या प्रजातीचा शोध लावला होता.
- पाच वर्षांच्या सखोल संशोधनानंतर त्या दुर्मिळ प्रजातींच्या पालींचे जनुकीय वेगळेपण ठरवण्यात आलं. या नव्याने शोधण्यात आलेल्या दुर्मिळ पालीचं नाव ‘मँग्निफिसंट डवार्फ गेको’ असं ठेवण्यात आलं आहे.
- सप्टेंबर २०२० मध्ये तेजस यांनी सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावला होता. महाराष्ट्राच्या पश्चिम सह्याद्री घाटातून ‘कॅट स्नेक’ सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला होता. या सापाच्या नव्या प्रजातीचं नाव ‘बोईगा ठाकरे’ असं ठेवण्यात आलं.
- पश्चिम घाटातील जैवविविधतेतेच्या माहितीत त्यांच्या संशोधनामुळे मोलाची भर पडत असते.