मुक्तपीठ टीम
सौदी अरेबिया, इराक, कुवेत, संयुक्त अरब आणि रशिया या देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या उत्पादनामुळे देशात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होऊन पेट्रोल-डिझेलच्या दरात ५ रुपये कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. सध्या कच्च्या तेलाची किंमत ७५ डॉलर इतकी आहे, वाढत्या उत्पादनामुळे त्यात घट होऊन ६५ डॉलर इतकी होणार आहे.
कच्च्या तेलाचे उत्पादन वाढल्याने, ऑगस्ट महिन्यापासून प्रति महिना ४ लाख बॅरल इतके उत्पादन वाढणार असून सप्टेंबरमध्ये ८ लाख बॅरल इतके वाढणार आहे. यानुसार ऑक्टोबरमध्ये १२ लाख बॅरल, नोव्हेंबरमध्ये १६ लाख बॅरल आणि डिसेंबरमध्ये २० लाख बॅरल इतके उत्पादन होणार आहे. एक बॅरेल म्हणजे १५९ लीटर कच्चा तेल असे मोजमाप वापरले जाते.
ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ नरेंद्र तनेजा यांनी पेट्रोल-डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या करामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढत असल्याचे सांगितले. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये ६० टक्के कर आकारण्यात येतो. राज्यात पेट्रोलची किंमत ४१ आणि ४२ रुपये प्रति लीटर इतकी आहे. परंतु दिल्लीत नागरिकांना पेट्रोलसाठी १०१.८४ रुपये आणि डिझेलसाठी ८९.८७ रुपये प्रति लीटर मोजावे लागतात, असे त्यांनी सांगितले.
कच्च्या तेलाचे उत्पादन वाढल्याने कच्च्या तेलाच्या किंमती कमी होणार असल्याचे आर्थिक आणि व्यावसायिक पत्रकार शिशिर सिन्हा यांनी सांगितले आहे. ‘आयआयएफएल’च्या उपाध्यक्षांनी सांगितले की, कच्च्या तेलाचे उत्पादन वाढल्याने येणाऱ्या दिवसांत कच्च्या तेलाचा दर कमी होऊन ६५ डॉलर बॅरल इतका होणार आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये ४ ते ५ रुपयांपर्यंतचा घट होऊ शकतो.
पुढील गोष्टींवर आधारित पेट्रोल-डिझेलच्या किंमती
- कच्च्या तेलाची किंमत
- रुपयांच्या तुलनेत अमेरिकेच्या डॉलरची किंमत
- केंद्र आणि राज्यसरकारकडून आकारण्यात येणारा कर
- देशात इंधनाची वाढती मागणी
२ ऑगस्ट २०२० रोजी, कच्च्या तेलाचा दर ४४ डॉलर प्रति बॅरल इतका होता, परंतु ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेता त्यांच्या किंमतीत झपाट्याने वाढ होत गेली. भारतात ८५ टक्क्यांहून जास्त कच्चा तेल हा परदेशातून खरेदी केला जातो. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने आणि डॉलरमध्ये पैसे मोजल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या जातात.