मुक्तपीठ टीम
कोकणातील महापूर साऱ्यांनाच हादरवणारा. त्यातही चिपळूणमधील हजारो सामान्यांसाठी हा महापूर होत्याच नव्हतं करणारा ठरला. पात्र सोडून उधळलेल्या नदीमाईचं पाणी आणि सोबत आणलेल्या चिखलानं वीज पुरवठ्याबरोरच विद्युत साधनांचीही ऐशी की तैशी करून टाकली. मुंबई राष्ट्र सेवा दलाचे शरद कदम, निसार अली आणि युवराज मोहिते हे संकट कोसळल्यापासून दोन कपड्यांवार पूरग्रस्त भागात तळ ठोकून आहेत. त्यांनी वीज समस्या दूर करण्याची नेमकी गरज ओळखून राष्ट्र सेवा दला आपल्या सेवाकार्यात वीज दुरस्तीलाही प्राधान्य दिले. मिरजच्या केंद्रातील इलेक्ट्रिशियनची टीम चिपळूणात दाखल झाली.
चिपळूणच्या वडनाका येथील “महिला मंडळ” या संस्थेच्या वसतीगृहात पुरामुळे सर्व लाईटचे बोर्ड पाण्याखाली होते. त्यामुळे सर्व लाईट बंद झाल्या होत्या. राष्ट्र सेवा दलाच्या इलेक्ट्रिशियन टीमने सर्व बोर्ड उघडले, चिखल लागलेला भाग धुवून घेतला, नंतर हेअर ड्रायरने हे सर्व भाग सुकवले. पाण्याची मोटार बंद पडली होती. ती सुरू करून दिली. इलेक्ट्रिक काम करताना पाण्याची टाकीही स्वच्छ करून दिली. ट्यूब लाईट लावून दिले, फॅनचे डीमर बदलायला सांगितले आहेत.
राष्ट्र सेवा दलाच्या या टीम सोबत अहमदनगर येथून आलेल्या प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या सहा वायरमननी बाजार पेठेतील अनेक घरात, दुकानात जावून अनेकांच्या घरातील अंधार दूर करत प्रकाश आणला. या टीमचे निखिल लोखंडे सांगत होते की, बाजार पेठेतील रंगोबा साबळे मार्ग येथील एका आठ बाय आठच्या घरात गरीब कुटुंब रहात होते. घरातल्या कर्त्या पुरुषाचा एक पाय खराब झालेला आहे. आठ दिवसांपासून घरात वीज नाही. MCB खराब झालेले. पाण्यामुळे घरात करंट येत होता. या घरातील बोर्ड साफ करून त्यांच्या घरात लाईट पेटला आणि त्या कर्त्या पुरुषाच्या डोळ्यात एक आनंदाची चमक दिसली.
अंधाराला दूर सारणारा प्रकाश पडल्यानंतर पूरग्रस्तांच्या चेहऱ्यांवर पसरणारा आनंद पाहून आमचा थकवा दूर झाला, असे राष्ट्र सेवा दलाच्या रोहित शिंदेंना जसं वाटलं तसंच भारावून सांगत होता…..
चिपळूणमध्ये पुरानंतर राष्ट्र सेवा दलाच्या वेगवेगळ्या भागातील केंद्रांनी मदत कार्य सुरू केले आहे. दोन दिवसांपासून सेवा दल मिरज केंद्राचे कार्यकर्ते रोहित शिंदे, सौरभ सूनके, ओमकार हिरगुडे, विनायक बलोलगा हे इलेक्ट्रिक मेंटेनन्सचे काम करीत आहेत.
निखिल लोखंडे यांच्या सोबत प्रथम संस्थेचे सुजित ससे, अमित ठाणगे, किशोर खुरंगे, अक्षय जगधाने, अभिजीत जाधव, निखिल सुरवसे हे अहमदनगर वरून कोकणातील पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आले होते. मुंबईतील सेवा दलाचे कार्यकर्ते प्रमोद निगुडकर यांनी या संस्थेच्या मित्रांना जोडून दिले होते.
बाजार पेठेत जाऊन हे इलेक्ट्रिशियन असलेले कार्यकर्ते अनेकांच्या दुकानात, घरात लाईट सुरू करण्याचे, फॅन सुरू करण्याचे काम करीत आहेत. मिरज सेवा दलाचा रोहित शिंदे आणि त्याच्या वायरमनची टीम, खेंड येथील परांजपे हायस्कूल येथे तळमजला आणि पहिला मजला येथील लाईट सुरू करण्यासाठी खूप धडपड केली.
कोकणातील महापूराने अनेकांच्या जीवनात अंधार पसरलाय. हा अंधार दूर करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. ही दीर्घ काळ चालणारी प्रक्रिया असणार आहे. नियोजनपूर्वक ते काम आपण करुया. सध्या घरात आणि दुकानांत असलेला अंधार दूर करायचं महत्वाचं काम इलेक्ट्रीशियन्सची टीम करतेय, असे राष्ट्रसेवा दलाचे शरद कदम यांनी सांगितले.
दूर अहमदनगर आणि सांगलीहून कोकणात आलेल्या या इलेक्ट्रिशियन कार्यकर्त्यांना सलाम!!