मुक्तपीठ टीम
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या महिन्यातच यूनोच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळाले आहे. हा संपूर्ण महिनाभर अध्यक्षपद भारताकडे असेल. सध्या जगाला भंडावणाऱ्या सागरी सुरक्षा, दहशतवाद आणि शांतता प्रक्रिया या तीन मु्द्द्यांना भारत महत्व देणार आहे. त्यामुळे जगाचं लक्ष आपल्याकडे लागले आहे. मात्र, अध्यक्षपद लाभण्याची नेमकी वेळ सोडली तर याचं खरंच फार वेगळं महत्व आहे का, ते समजून घेण्याचा प्रयत्न.
वेळ महत्वाची!
- भारताच्या सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाची वेळ महत्त्वाची आहे.
- अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून मायदेशी परतत असताना तालिबानने उठाव केला आहे, भारताच्या दृष्टीने पाकिस्तानी कुरापतखोरीविरोधात आंतरराष्ट्रीय मंचावर भूमिका घेण्यासाठी अध्यक्षपदाचा मुहूर्त फायद्याचा आहे.
- या ५ ऑगस्ट रोजी काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याला २ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यावेळी पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी पुन्हा थैमान घालण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने तो मुद्दा आंतरराष्ट्रीय मंचावर मांडण्याचा प्रयत्न केला तर हे पद उपयोगी ठरू शकेल.
- भारतीय स्वातंत्र्याचा ७५वा स्वातंत्र्यदिन या वर्षी १५ ऑगस्टला साजरा करणार आहोत. स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात हे पद भारताकडे असणे प्रतिष्ठा वाढवणारे आहे.
- त्यामुळे या एका महिन्यात भारताला आपल्या अजेंड्यामुळे वेधलेलं जगाचं लक्ष आता आपण नेमकं काय करतो, त्यावर कायम खिळून असेल.
सुरक्षा परिषदेचे महत्व काय?
- जगातील सर्व देशांमध्ये शांतता, सुरक्षा आणि मैत्रीपूर्ण संबंध वाढवण्यासाठी दुसऱ्या महायुद्धानंतर १९४६मध्ये संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली.
- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ही संयुक्त राष्ट्राच्या ६ प्रमुख विभागांपैकी एक आहे.
- जगभरात शांतता आणि सुरक्षा राखणे हे सुरक्षा परिषदेचे मुख्य काम आहे.
- स्थापनेच्या वेळी सुरक्षा परिषदेचे ११ सदस्य होते, १९६५मध्ये ही संख्या वाढवून १५ झाली.
सुरक्षा परिषदेचे किती सदस्य आहेत?
- सुरक्षा परिषदेची एकूण १५ राष्ट्रे सदस्य आहेत.
- त्यापैकी ५ कायम आणि १० अस्थायी सद्य आहेत.
- स्थायी सदस्यांमध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया आणि चीन यांचा समावेश आहे.
- जर स्थायी सदस्यांमधील कोणताही देश एखाद्या निर्णयाशी असहमत असेल तर तो पास होण्यापासून रोखण्यासाठी व्हेटो पॉवर म्हणजेच नकाराधिकाराचा वापरू शकतो.
भारताला सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद का मिळाले?
- संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद दर महिन्याला बदलते.
- सदस्य देशाला प्रत्येक महिन्याला इंग्रजी अल्फाबेटच्या क्रमानुसार अध्यक्षपद प्राप्त होते.
- भारतापूर्वी सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद जुलैमध्ये फ्रान्सकडे होते.
- सप्टेंबरमध्ये आयर्लंडला ही जबाबदारी मिळेल.
- भारत गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात दोनदा सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष होत आहे.
सुरक्षा परिषदेचा अध्यक्ष झाल्यानंतर फायदा काय?
- तज्ज्ञाच्या मते, भारताकडे सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद ही प्रशासकीय बाब आहे.
- यापदाचा वापर करून कोणताही राजकीय अजेंडा राबवणे तसे सोपे नसते.
- प्रत्येक सभेचा अजेंडा देखील आधीच ठरलेला असतो.
- त्यामुळे तुम्हाला काही नवीन करण्याचा प्रयत्न करण्याची फारशी संधी नसते.
- एक मात्र आहे की अमेरिका पाय काढत असताना अफगाणिस्तानात तालिबानी दहशतवादाचं थैमान सुरु झालंय. त्याविरोधात भारताने अध्यक्षस्थानावरून घेतलेल्या भूमिकेला जगात वेगळं महत्व असेल. पाकिस्तानची कोल्हेकुई त्याच मुद्द्यावर सुरु झाली आहे.