मुक्तपीठ टीम
कोकणाला बसलेला पुराचा तडाखा महाराष्ट्राला आपलं म्हणणाऱ्या अनेक अमराठी भाषिकांना हेलावणारा ठरला आहे. मुंबईकर उत्तर भारतीयांच्या ‘अभियान’ या सामाजिक-सांस्कृतिक संस्थेतर्फे १७ वर्षांपासून सातत्याने आयोजित करण्यात येणारा कजरी महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कजरी महोत्सवावर खर्च करण्यात येणारी रक्कम कोकणातील पूरग्रस्त भागातील लोकांच्या मदतीसाठी खर्च केली जाईल, अशी माहिती फिल्मसिटी महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि ‘अभियान’चे संस्थापक अमरजीत मिश्रा यांनी दिली आहे.
स्त्री शक्ती सन्मानाचा हा कार्यक्रम, जो गेल्या १७ वर्षांपासून आयोजित केला जातो. कोरोना काळातही लोकांनी व्हर्चुअल पद्धतीने या महोत्सवाचा आनंद घेतला. यावर्षी हा महोत्सव ७ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान होणार होता. मात्र यावेळी, अतिवृष्टीमुळे कोकणात झालेल्या नुकसानामुळे मुंबईतील उत्तर भारतीयांनी यावर्षी हा महोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी कोकणातील लोकांना संदेश दिला आहे की, ‘कोंकण के करबय गुलजार हो, कतव न ही सून मोरे भईया’ म्हणजेच “कोकणात झालेला विंध्वंस तसाच नाही राहू द्यायचा, पुन्हा तिथं उल्हास फुलवायचा!”
या वेळी मुंबईच्या उत्तर भारतीयांना जरी प्रसिद्ध कजरीचे बोल “मिर्झापूर कैल्या गुलजार हो, कचोडी गली सून कैल्या बालामू” ऐकू येणार नसले तरी मुंबईच्या उत्तर भारतीयांनी निष्ठा व्यक्त केली आहे. मिश्रा यांनी सांगितले की, लोक परंपरेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव यावर्षी रद्द करून, आता कर्मभूमीमध्ये उद्भवलेल्या आपत्तीला तोंड देण्यासाठी सहकार्य केले जाईल.
नेमका काय आहे कजरी महोत्सव?
- कजरी म्हणजे उत्तरप्रदेशातील लोकगीतांचा उत्सव
- कजरी महोत्सव आणि स्त्री शक्ती सन्मानाचा हा कार्यक्रम
- मुंबईत गेल्या १७ वर्षांपासून सातत्याने आयोजित केला जात आहे.
- गेल्या वर्षी कोरोना काळातही लोकांनी व्हर्चुअल पद्धतीने महोत्सवाचा आनंद घेतला होता.
“बेटी बचाओ बेटी पढाओ” अंतर्गत विविध क्षेत्रातील सर्वोत्तम महिलांना दिला जाणारा स्त्री शक्ती सन्मान कार्यक्रम ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात आयोजित केला जाईल.