मुक्तपीठ टीम
बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या संवर्धन आणि विकासासाठी दोन आठवड्यात विकास प्राधिकरण स्थापन करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. हा तलाव पन्नास हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक उल्कापिंड धडकल्याने निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारनेही लोणार सरोवराच्या प्रूदषणमुक्तीसाठी पावलं उचलण्याची घोषणा केली होती. आता न्यायालयाच्या निर्देशांनंतर त्या पावलांचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अनिल किलोर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकाकर्त्याने तलावाचा बदलता रंग आणि संवर्धनाची गरज यावर चिंता व्यक्त केली होती. जगभरातील शास्त्रज्ञ त्यावर संशोधन करायला येतात. गेल्या वर्षी पाण्याचा रंग गुलाबी झाला होता, ज्यामुळे हा तलाव केवळ स्थानिक लोकांमध्येच नव्हे तर शास्त्रज्ञांमध्येही कुतूहलाचा विषय बनला होता.
वकील सी.एस. कप्टन हे एक ‘अमीकस क्युरि’ आहेत आणि सरोवराच्या संवर्धनासाठी स्थापन केलेल्या न्यायालयीन समितीचे सदस्य आहेत.
लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी आणि विकासाकरिता’लोणार क्रेटर लेक अथॉरिटी’ नावाची स्वतंत्र केंद्रीय संस्था स्थापन करण्यासाठी त्यांनी २७ जुलै रोजी उच्च न्यायालयात प्रस्ताव सादर केला. न्यायालयाने यावर अमीकस क्युरिआकडून नवीन प्रस्ताव प्राप्त झाला आहे आणि केंद्रीय समिती स्थापन करणे योग्य होईल, असे सांगितले.
उल्कापातामुळे निर्माण झालेल्या विवरातील सरोवर
- लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे.
- लोणार सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली.
- लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे.
- याचे पाणी अल्कधर्मी आहे.
- लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.
- या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत.
- त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत.
- सरोवराची निर्मिती ५२,००० ± ६००० वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते. पण २०१० साली प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात सरोवराचे वय ५,७०,००० ± ४७,००० वर्ष इतके वर्तवण्यात आले आहे.
- अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था, युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी यासारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे.