पूजा शिंदे / मुक्तपीठ टीम
मीराबाई चानू या सामान्य वाटणाऱ्या नावाने ऑलिंपिकमध्ये अद्भुत खेळाचे प्रदर्शन करून असामान्य यश कमावलं आहे. आपल्यासारखीच सामान्य भारतीय असणाऱ्या मीराबाईनं टोकियो ऑलिंपिकमधील विजयातून प्रत्येक भारतीयाची मान उंचावली आहे. तिचं जमिनीशी असलेलं नातं ट्विटरवरील एका छायाचित्रातून समजते. पारंपारिक पद्धतीने जमिनीवर बसून जेवत असल्याचे या फोटोमध्ये दिसत.
जीवनात कितीही यश मिळाले तरीही आपल्या मुळांशी बांधिलकी कायम राखलेल्या चानू यांचा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. चला तर मग जाणून घेऊया या यशासाठी तिनं कशी पूर्वतयारी केली, काय डाएट फॉलो केला आणि ऑलिंपिकच्या अवकाशाला गवसणी घातल्यानंतरही जमिनीशी तिनं जमिनीशी असलेलं नातं कसं कायम राखलंय…
मीराबाईचा ऑलिंपिक पदकापर्यंतचा संघर्ष
जेव्हापासून मीराबाई चानू टोकियो मधून रौप्यपदक घेऊन परतली आहे, तेव्हापासून देशात सर्वत्र तिचं कौतुक होत आहे. मात्र, हे यश सोपं नव्हतं. तिनं स्वतःच्या आरोग्याची कशी काळजी घेतली. वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकून मीराबाई चानूनं देशाचं नाव जागतिक स्तरावर उंचावलं आहे. तिनं जिद्द, परिश्रम आणि चिकाटीने तिरंग्याची शान वाढवलीच आहे, यासोबतच तिचं मणिपूर राज्याचाही डंका भारतभर वाजवला आहे. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी मीराबाईच्या प्रयत्नांचे चौफेर कौतुक होत आहे. पण तिचा प्रवास सोपा नव्हता. तो होता प्रतिकुलतेतून पदकापर्यंतचा. अपयशापासून यशापर्यंतचा. सोपा नाही तर खडतर असा.
अपयशातून यशाकडे…परिश्रम आणि जिद्दीनं!
रिओ ऑलिंपिकमध्ये अपयश मिळाल्याने चानू निराश झाली होती. पण जास्त काळ नाही. काही झालं तरी चालेल. पण टोकियोमध्ये ही स्थिती बदलायचीच, असा तिनं निर्धार केला. स्पर्धेच्याआधीच भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याची इच्छा आहे असे तिनं सांगितलं. टोकियोमधून पदक मिळवूनच परतेन, असा आत्मविश्वास तिला होता. रिओमधील निराशेनंतर तिनं निर्धार केला होता, की काही झालं करी पदक मिळवलंच पाहिजे. पुढील स्पर्धा कोणतीही असो स्पर्धेत उतरल्यानंतर सर्वोत्तम कौशल्याचं दर्शन घडवलंच पाहिजे. ऑलिंपिकमधील आयडियल वजनाचं क्रेडिट ती कोच विजय शर्मा यांना देते. विजय यांनी मागील पराभव विसरून भविष्यासाठी तयारी करण्यास प्रोत्साहन दिले. त्यांच्यामुळेच आज ऑलिंपिक पदक मिळवू शकले, असे मीराबाई कृतज्ञतेनं सांगते.
“मेडल जिंकूनच परतणार!”
केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्व महिलांसाठी मीराबाई एक प्रेरणा बनली आहे. एखादं लक्ष्य ठरवल्यानंतर ते पूर्णत्वास नेणाऱ्या जिद्दी खेळाडू म्हणजे आपली मीराबाई. ऑलिंपिकला जाण्याआधी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना ती म्हणाली, “मेडल जिंकूनच परतणार!” आणि तिनं तसंच करून दाखवलं! प्रचंड मेहनत, समर्पण आणि दृढनिश्चयाशिवाय कुणीही लोकल ते ग्लोबल भरारी घेऊ शकणार नाही.
कोरोना लॉकडाऊननं नुकसान, कठोर परिश्रमानं शरीराची हानी!
मीराबाई चानूच्या ऑलिंपिक तयारीला कोरोना महामारीचा वाईट फटका बसला होता. त्याचा दुष्परिणाम प्रशिक्षणावर परिणाम दिसून आला. तरीही स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व अडचणींना तिनं लिलया पार केले. लॉकडाऊनच्या काळात ती प्रशिक्षण घेऊ शकली नाही. परंतु लॉकडाउननंतर तिनं प्रशिक्षणास सुरुवात केली. परंतु त्याचेही वेगळे दुष्परिणाम झाले. मोठ्या खंडानंतर प्रशिक्षण सुरू केले. तेही खूपच कठोर असे. त्यामुळे खूप ठिकाणी दुखापत देखील झाली. असे चानू यांनी सांगितले.
मीराबाई कमालीच्या शिस्तीची…कडक डाएट!
जिंकण्यासाठी केलेल्या मेहनतीसोबतच तिनं खाण्यापिण्यावर देखील कडक निर्बंध लावले होते. स्पर्धेसाठी मीराबाई यांना वजन कायम ठेवायच असल्याने. वजन कमी किंवा जास्त होईल अशा कोणत्याच पदार्थांचे सेवन त्या करत नव्हत्या. वेटलिफ्टिंग ट्रेनिंग चालू असताना मोठ्या काळासाठी एकाच डायटच पालन करत होत्या. मीट, फळे, भाज्या अशा पदार्थांचा मर्यादित स्वरूपात समावेश असे.
मीराबाई चानू ब्रेकफास्टमध्ये अंडी, २ ब्रेड आणि ५ प्रकारच्या फळांचे सेवन करत असत. ज्यामध्ये एवाकाडोचा देखील समावेश असे. दुपारच्या जेवणामध्ये मासे आणि सॅलमॉन, पोर्क मीट मर्यादित स्वरूपात घेत असत. हे सर्व जेवण नॉर्वेवरून येत असे. याशिवाय तिनं व्यायाम, ट्रेनिंग आणि ठरलेला दिनक्रम कधीही चुकवलं नाही.
ऑलिंपिक पदकाआधीचे २ दिवस मीराबाईचा उपवास!
• मीराबाईनं स्पर्धेआधी २ दिवस काहीही खाल्लं नाही.
• कारण तिला तिच्या वजनाचं टेन्शन आलं होतं.
• ४९ किलोग्रॅम गटासाठी आयडियल वजन कायम ठेवणं सोपं नव्हतं.
• हे खूप कठीण होतं या गटासाठी वजन कायम ठेवण्यासाठी डाएट कंट्रोलमध्ये ठेवण गरजेचं होत.
• त्यामुळे मीराबाई जंक फूडचं नाही तर नेहमीच्या खाण्यातीलही बऱ्याच गोष्टी खाऊ शकत नव्हती.
ऑलिंपिक तयारीसाठी आवडता पिझ्झाही टाळला…आता जन्मभर मोफत!
ऑलिंपिकच्या तयारीच्या वेळेस मीराबाईनं कोणत्याही प्रकारच्या जंक फूडचे सेवन केलं नाही. तिला स्नॅक्समध्ये पिझ्झा आणि गोड पदार्थांमध्ये आईस्क्रीम फार आवडते. परंतु तिनं तयारी दरम्यान यातील काहीच खाल्लं नाही. जेव्हा तिनं आवड आणि केलेला त्याग उघड केला, तेव्हा एका पिझ्झा कंपनीने तिला आयुष्यभर फ्री पिझ्झा देण्याची घोषणा केली!
जमिनीवर बसून जेवणारी साधी भोळी मीराबाई!
मीराबाई चानूनं ग्लोबल भरारी घेत यांनी ४९ किग्रॅ. या गटात रौप्य पदक मिळवलं. तिनंच पदकांच्या तक्त्यात भारताचं खातं उघडलं. आता तिच्यानंतर पदकांची मालिका सुरु झाली. संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. खेळाशी संबंध नसलेल्या मुलीही तिला आपला आदर्श मानत आहेत. यातच मीराबाईचा एक फोटो व्हायरल होत आहे. मीराबाई जगविख्यात झाली असली तरी आपली पारंपरिक पद्धत, आपली माणसं आणि आपलं साधंसं घर विसरलेली नाही. तिला त्यातील कसलंही कमीपणाचं वाटत नाही, हे दिसतं.
@Rajatsethi86 यांनी हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये मीराबाई चानू आपल्या घरी पारंपरिक पद्धतीने जेवत आहेत. यासोबतच्या कॅप्शनमध्ये रजत लिहतात की, ‘गरिबी कधीच स्वप्न पूर्ण न करता येण्याच कारण नसतं, भारताच्या लाडक्या मीराबाई चानू टोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक मिळवल्या नंतर आपल्या मणिपुरच्या घरी परतल्या.
अर्थात त्यांनी गरिबी हा शब्द वापरला असला तरी कुबेरालाही लाजवेल असं काम मीराबाईनं केलंय. तिनं खातं न उघडू शकलेल्या देशाला पहिलं पदक मिळवून दिलं. देशाचा तिरंगा ऑलिंपिकमध्ये डौलात फडकवला. तिची श्रीमंती वेगळीच. घरचं साधेपण नक्कीच तिच्याविषयी अभिमान वाढवणारं. त्यामुळेच तर अभिनेता आर. माधवननही दखल घेतली. माधवननं म्हटलं, ‘अविश्वसनीय, शब्दांमध्ये व्यक्त करणे कठीण आहे.’
मीराबाईचं यश आहेच तसं. अविश्वसनीय. शब्दांमध्ये व्यक्त करता न येणारं. अर्थात अभिमान मात्र वाढवणारं!