मुक्तपीठ टीम
पॉर्नप्रकरणी अटक असलेल्या उद्योजक राज कुंद्राच्या अडचणीत असतानाच पुन्हा एका आरोपाची भर पडली आहे. भाजप आमदार राम कदम यांनी राज कुंद्राने त्याच्या जीओडी म्हणजे गेम ऑफ डॉट्स या ऑनलाईन गेमद्वारे हजोरी कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. खेळाच्या नावाखाली त्याने गरिबांचे पैसे हडप केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राम कदमांचे राज कुंद्रावर नेमके काय आरोप?
• राज कुंद्राची विआन इंडस्ट्रीजच्या नावावर एक कंपनी आहे. त्या कंपनीचे संचालक राज कुंद्रा हे आहेत.
• जीओडी (गेम ऑफ डॉट्स) हा या कंपनीचा खेळ आहे.
• कंपनीच्या पत्रकांवर खेळाच्या प्रसिद्धीसाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे छायाचित्र वापरण्यात आले.
• या खेळाला सरकारची मान्यता असून खेळात जिंकणाऱ्याला बक्षिस म्हणून रक्कम मिळत असे.
• बक्षिसांच्या नावाखाली देशातील अनेकांची फसवणूक झाली.
• या फसवणुकीत कंपनीने २५०० ते ३००० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.
राम कदम म्हणाले की, ‘या गेमच्या प्रचारासाठी राज कुंद्राने पत्नी शिल्पा शेट्टीचे नाव आणि तीचे छायाचित्रे वापरली असून अनेकांची फसवणूक केली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आम्ही आदर करतो, परंतु शिल्पा शेट्टीचा चेहरा या गेमच्या जाहिरातीसाठी वापरण्यात आला.’ असे ते म्हणाले.
‘संविधानाने कोणालाही फसवण्याचा अधिकार दिला नाही. कोणाकडून ३० लाख घेण्यात आले तर कोणाकडून १५ ते २० लाख घेण्यात आले. या खेळातर्गत अनेकांना फसवण्यात आले आहे. दरम्यान काहींना हा फसवणुकीचा खेळ असल्याचा अंदाज आला. अशाप्रकारे गरिबांना लुटण्याचा अधिकार राज कुंद्राला कोणी दिला?’, असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, फसवणुक झाल्यानंतर पैसे परत मागण्यासाठी ऑफिसला गेलेल्यांना मारहाणदेखील करण्यात आली. कोणत्याही विशेष व्यक्तीच्या विरोधात किंवा त्यांचे समर्थन करण्यास पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली नसून राज कुंद्राने केलेल्या फसणुकीविरुद्ध आवाज उठवत असल्याचे त्यांनी सांगितले.
राज कुंद्राला कलम ४२० (फसवणूक), ३४ (सामान्य हेतू), २९२ आणि २९३ (अश्लिलता आणि अनिश्चितता), आणि माहिती कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे.