मुक्तपीठ टीम
मोठा पाऊस पडतोय. रस्त्यांवर पाणी साचलंय. नाही मला थोडं बरं नाही वाटत. एक नाही अनेक कारणं आपल्यातील काहीजण दांडी मारण्यासाठी देत असतात. पण महाराष्ट्रांच्या ऊर्जा खात्यातील एक कनिष्ठ अभियंता असाही की ज्याने पायाला इजा झाल्यानं सुट्टीवर असतानाही आपल्या टीमसोबत पुराच्या पाण्यात जाऊन गावांचा वीज पुरवठा सुरु केला.
नितीन माळी हे सांगली जिल्ह्यातील वसगडे सेक्शनमध्ये कनिष्ठ अभियंता आहेत. ते ११ जुलै ते ३१ जुलै रजेवर होते. त्यांच्या पायाला इजा झाल्यानं ते उपचार घेत होते. तेवढ्यात मोठा पाऊस सुरु झाला. पूर आला. २४ जुलैला वसगडे, खटाव, ब्रम्हनाळ, सुखवाडी या गावांचा वीज पुरवठा खंडित झाला.
गावकऱ्यांची अडचण ओळखून उप कार्यकारी अभियंता व्हनमाने, कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांनी नितीन माळींना कॉल केला की लोकांची गैरसोय नको. नितीन माळी दुखणं विसरुन कामावर आले. कारण ११ हजार व्हॉल्टच्या लाइनचे काम करताना टीमला धोका नको.
त्यांनी लाइनमन रमेश वनारसे, संदिप नगराळे – लाइफ जॅकेट, धनंजय पाटील, रोहित पाटील, अनिल वडेर, बाळासाहेब यादव, महादेव कोळी, वनसिद फिरंगी या टीमला सोबत घेतले. तासगाववरून उलटा सप्लाय घ्यायचे ठरवले. पण ट्रांसफॉर्मरवर पाण्यात होते. पोहत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. लाइफ जॅकेट घालून टीम तयार केली. पोहणारी माणसं घेतली. आणि आधी वसगडेचा वीज पुरवठा सुरु केला. त्यानंतर ब्रह्मनाळ ग्रामपंचायतीची बोट मागवली. पाहणी केली. क्रमाक्रमाने इतर गावांचाही वीज पुरवठा सुरु करण्यात आला.
हे सारं सोपं नव्हतं. संपूर्ण टीमला पुराच्या पाण्याचा धोका होता. कोणत्याही परिस्थितीत थोडीशीही चूक परवडणारी नव्हती. पण नितीन माळी यांनी आपल्या टीमचं मनोधैर्य वाढवत ते करून दाखवलं. ऊर्जाखात्याचं नाव प्रकाशमान केलं. याआधीही त्यांनी २०१९च्या पुरात असाच पराक्रम गाजवला होता. त्यामुळे आता पूर आला तरी वीज पुरवठ्याच्या बाबतीत त्यांचे वरिष्ठ आणि स्थानिक गावकरी बिनधास्त असतात. कारण नितीन माळी आणि त्यांच्या टीममधील ऊर्जा नायक असताना अंधाराची भीतीच कशाला?
पाहा व्हिडीओ: