मुक्तपीठ टीम
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे नेतृत्व करणारे नरवीर बहिर्जी नाईक यांच्या बाणुरगड येथील समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत लवकरच बैठक घेऊन सविस्तर नियोजन करण्यात येईल, असे राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
स्थानिक आमदार अनिल बाबर यांनी आज मंत्री ठाकरे यांची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन त्यांना सादर केले. त्याची तातडीने दखल घेऊन बाणुरगड येथील समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगिण विकास केला जाईल, असे मंत्री ठाकरे यांनी सांगितले. यासंदर्भात पर्यटन विकास नियोजन करण्यासाठी बैठक आयोजित करण्याच्या सूचना मंत्री ठाकरे यांनी संबंधीतांना दिल्या. त्यानुसार लवकरच पर्यटन आणि संबंधीत विभागांची बैठक घेऊन बाणुरगड या ठिकाणी येणाऱ्या पर्यटक आणि अनुयायांना विविध दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे, या परिसराचा विकास करणेबाबत नियोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
मंत्री ठाकरे म्हणाले की, शिवरायांचा इतिहास आणि त्यांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्याचपद्धतीने शिवरायांसाठी कार्य करणाऱ्या मावळ्यांचा इतिहासही प्रेरणादायी आहे. नरवीर बहिर्जी नाईक यांनी गुप्तहेरीमधील आपल्या कौशल्याने स्वराज्य स्थापनेत महत्वाचे योगदान दिले. त्यांचे कार्य जगासमोर येण्याच्या दृष्टीने तसेच त्यांच्या कार्यातून सर्वांना प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचे समाधीस्थळ असलेल्या भागाचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगिण विकास केला जाईल, असे ते म्हणाले.
आमदार बाबर यांनी यावेळी पारे येथील दरगोबा मंदीर परिसराच्या विकासासाठीही पर्यटन योजनेंतर्गत निधी उपलब्ध होण्याबाबत निवेदन सादर केले.