मुक्तपीठ टीम
भारतात दुबईतून सोने तस्करीचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यातही ही तस्करी शरीराच्या गुदाशयासारख्या भागात सोन्याची पेस्ट लपवून केली जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. गेल्या तीन वर्षात गुदाशयातून सोने लपवून आणण्याच्या उघडकीस आलेल्या प्रकारांमधून कोट्यवधी रुपयांचे सोने कस्टमने जप्त केले आहे. चेन्नईत नुकत्याच जप्त करण्यात आलेल्या गुदद्वारातून सोन्याच्या रॅकेटच्या पार्श्वभूमीवर या वेगळ्या सोने तस्करीचा वेध.
दुबईहून भारतात परतलेल्या एका प्रवाशाला कस्टम अधिकाऱ्यांनी ८१० ग्रॅम सोन्यासह अटक केली आहे. या व्यक्तीने सुमारे ४० लाख रुपयांचे सोने दुबईहून चेन्नईला आपल्या गुदाशयात लपवून आणले होते. त्याच्या हालचालीवरून संशय आल्यानं कस्टम अधिकाऱ्यांनी हटकले. त्याच्या तपासणीत त्याने गुदद्वारातून आतल्या भागात पिशव्यांमध्ये सोने दडवल्याचं उघड झालं. कस्टमने त्याला अटक करून सोने जप्त केले आहे.
शरीरातून सोने तस्करी कशासाठी?
- शरीरात गुदाशयात सोने लपवले तर अनेकदा ते तपासणीत पकडले जात नाही. त्यामुळे अशा पद्धतीने सोन्याची तस्करी करण्याचे प्रमाण वाढते आहे.
- पण तस्करांच्या काही कॅरियर्सना गुदाशयातील वेदनेमुळे अवघडलेपण येते त्यामुळे त्यांच्या हालचाली बदलल्यानं कस्टम अधिकारी त्यांची तपासणी करतात. त्यातून काही कॅरियर पकडले जातात.
- महिला प्रवाशांच्या बाबतीत शारीरिक तपासणी तेवढी कडक नसते, त्यामुळे अनेकदा त्यांचा वापर जास्त केला जातो.
- २०१८मध्ये पुणे विमानतळावर पकडलेल्या चारही कॅरियर महिला होत्या.
ताजी घटना चेन्नईची…पण सोने दुबईचेच!
- चेन्नई विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी दुबईहून येणार्या एका प्रवाशाला रोखले आणि त्याची तपासणी केली.
- तपासणीत असे आढळले की त्याच्या गुदाशयात सोन्याच्या पेस्टचे ४ बंडल आहेत.
- २४ कॅरेट सोन्याचे वजन ८१० ग्रॅम आहे आणि त्याची किंमत ४०.३५ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
- त्यास अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
- भारतापेक्षा दुबईत सोने स्वस्त असल्याने ते कर टाळण्यासाठी शरीरीत लपवून तस्करी केली जाते.
शरीरात लपवून सोन्याच्या तस्करीचे वाढते प्रकार
- परदेशातून बेकायदेशीरपणे भारतात सोनं आणणं ही काही नवीन गोष्ट नाही. बहुतेक लोक सोन्याचे पेस्ट त्यांच्या गुदाशयात लपवून आणतात.
- १६ ऑक्टोबर २०१८ रोजी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुदाशयातून सोने लपवून आणण्याची घटना उघडकीस आली होती. कस्टम अधिकाऱ्यांना चार महिला प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांची तपासणी केली असता दोन किलो ३५ ग्रॅम सोने सापडले. त्याची किंमत ६६ लाख ५० हजार होती.यावर्षी जानेवारीत चेन्नईमधील कस्टम अधिकाऱ्यांनी तीन दिवसांत ९ किलो सोने पकडले आहे.
- गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चेन्नईच्या कस्टम अधिकाऱ्यांनी दोन पुरुषांना पकडले होते ज्यांनी त्यांच्या गुदद्वारामध्ये ७०६ ग्रॅम सोने लपविले होते.
- यावर्षी मे महिन्यात चेन्नईच्या कस्टम अधिकाऱ्यांनी एका व्यक्तीला पकडले होते. त्याच्या पायाच्या बँडेजमध्ये १ किलो ८० ग्रॅम सोनं लपवले होते. या सोन्याची किंमत सुमारे ९० लाख रुपये होती.
- गेल्या महिन्यात २३ जून रोजी दिल्लीच्या आयजीआय विमानतळाच्या कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण १३९९ ग्रॅम सोन्याचे सामान जप्त केले. ज्याची किंमत सुमारे ६३लाख रुपये होती.
- यावर्षी फेब्रुवारी महिन्यात आयजीआय विमानतळाच्या कस्टम अधिकाऱ्यांनी ४.१ किलो सोन्यासह दोन जणांना पकडले होते. ज्याची किंमत १.७७ कोटी होती.
भारतात परदेशातून सोने आणण्यासाठी नियम
- भारतीय पुरुष नागरिक त्यांच्याबरोबर २० ग्रॅमपर्यंत सोने कोणत्याही शुल्काशिवाय देशात आणू शकतात.
- या सोन्याची किंमत ५०,००० रुपयांपेक्षा जास्त नसावी.
- भारतीय महिल नागरिकांसाठी ही मर्यादा ४० ग्रॅम आहे.
- ज्याची किंमत १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी.
- मात्र, ही सवलत केवळ दागिन्यांच्या रूपात आणलेल्या सोन्यावरच उपलब्ध आहे.