मुक्तपीठ टीम
कोरोनामुळे प्रलंबित पाचवी आणि आठवी इयत्तेच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्टला घेतली जाणार आहे.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे दरवर्षी फेब्रुवारीमध्ये घेतली शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. त्यानंतर कोरोना पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलून एप्रिल महिन्यात घेण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. पण कोरोनाची परीस्थिती नियंत्रणात न आल्याने पुन्हा या परीक्षेला स्थगिती देण्यात आली. आता कोरोनाची परिस्थीती हळूहळू आटोक्यात येत असल्याने ही परीक्षा येत्या ८ ऑगस्ट रोजी होईल.
सन २०२०-२१ च्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून ८ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यास शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. परीक्षार्थींना मनापासून शुभेच्छा! #शिष्यवृत्ती pic.twitter.com/sKYUbGolvB
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 20, 2021
सर्वसाधारणपणे दरवर्षी पाचवी आणि आठवीचे सुमारे १० लाखांहुन अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी करतात. परंतु, यंदा कोरोनामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी संख्येत घट झाली आहे. इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण ६ लाख २८ हजार ६३० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यात पाचवीच्या साडेतीन लाखांहून अधिक, तर आठवीच्या अडीच लाख विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
कोरोना संबंधित नियमांचे पालन करण्याच्या अटींवर ८ ऑगस्टला पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी स्पष्ट केले आहे.