मुक्तपीठ टीम
भारतातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मंत्री, न्यायाधीश आणि उद्योगपती यांच्यावर पेगॅससच्या माध्यमातून पाळत ठेवून फोन हॅक करण्यात आल्याची बाब गंभीर असून याप्रकरणाची चौकशी करून जो जबाबदार असेल त्याच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
पेगॅससने सॉफ्टवेअर स्पायवेअरच्या मदतीने जगभरातील आणि भारतातील काही लोकांचे फोन हॅक केल्याचा मुद्दा आज समोर आला.
इस्त्रायलमधील सॉफ्टवेअर एजन्सीने आमचं सॉफ्टवेअर फक्त सरकारलाच विकत असल्याचे स्पष्ट केले आहे. खाजगी लोकांना नाही. जर खाजगी लोकांना विकण्यात आले नाही तर केंद्रसरकारच्या कुठल्या एजन्सीने देशातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, मंत्री, न्यायाधीश, उद्योगपती यांचे फोन हॅक करुन पाळत ठेवली असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.
केंद्रसरकारच्या माहितीसाठी हे करण्यात आले असेल तर कुठल्या अधिकार्याने किंवा एजन्सीने फोन हॅक करुन पाळत ठेवली याचे उत्तर मोदी सरकारने जनतेला दिले पाहिजे असेही नवाब मलिक म्हणाले.