मुक्तपीठ टीम
राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आरपीआयने दमदार कामगिरी केली असून २ हजार ९६० पेक्षा अधिक सदस्य आरपीआयचे निवडून आले आहेत. राज्यात भाजपा आणि आरपीआयचे ग्रामपंचायत निवडणुकीत बहुमत लाभले. राज्यात भाजपावरच जनमानसांचा विश्वास असल्याचे या निवडणुकीत सिद्ध झाले आहे, असा दावा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केला आहे.
निवडून आलेल्या ग्राम पंचायत सदस्यांनी निवडणुकीत झालेले वाद बाजूला सारून एकदिलाने गावाच्या विकासासाठी निष्पक्षपणे काम करावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.
राज्यात १२ हजार ७११ ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत आरपीआयचा अंदाजे ६० ग्रामपंचायतीवर निळा झेंडा फडकला असून संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत ३ हजार सदस्य आरपीआयचे निवडून आले आहेत, अशी माहिती आरपीआयचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यात आरपीआयने स्वबळावर निवडणुका लढविल्या असून येथील अक्कलकोट तालुक्यातील गावात आरपीआयने भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी आशा सर्व पक्षांना दणका देत स्वबळावर सर्व उमेदवार निवडून आणून ग्रामपंचायतीवर निळा झेंडा फडकविला असल्याची माहिती राजभाऊ सरवदे यांनी दिली आहे.
ग्रामीण भागात आरपीआयची जनतेशी नाळ घट्ट आहे. अनेक ठिकाणी स्वबळावर तर राज्यभरात बहुतांश ठिकाणी भाजपाशी युती करून आरपीआयने ग्रामपंचायत निवडणूक लढविली आहे. त्यात आरपीआयचे ३ हजार हुन अधिक निवडून आल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला आहे.