मुक्तपीठ टीम
मराठा आरक्षणावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुरु होणारी सुणावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायलयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर ही सुनावणी होत आहे. मागील सुनावणीत मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास नकार दिला होता आणि २५ जानेवारीला अंतिम सुनावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या ज्वलंत प्रकरणावर पाच दिवस आधीच म्हणजे २० जानेवारीलाच सुनावणीला सुरूवात होण्याची अपेक्षा होती. मात्र, आता ५ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. मात्र, ही सुनावणी प्रत्यक्ष असणार की अप्रत्यक्ष हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे.
गेल्या वर्षी ९ डिसेंबरला झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने मराठा अरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने हे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडे सुपुर्त करण्याची मागणी केली होती. त्याच बरोबर आरक्षणावरील स्थगिती उठवण्याचीही मागणी केली होती. मात्र, त्यावेळी स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. आजपासून पुन्हा या प्रकरणावर सुनावणी सुरु होणार होती. आता ५ फेब्रुवारीपासून सुनावणी होईल. तसेच ही सुनावणी अंतिम असण्याची शक्यता आहे.
न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्यायमूर्ती अब्दुल नजीर, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट यांचा समावेश असलेल्या घटनापीठासमोर मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला ईडब्लूएस आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता.
तर आता ५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या सुनावणीत काय निर्णय घेतला जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.