डॉ. राहुल पंडित
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण या विषयाचा अनेक चर्चा-वादविवादांतून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. सुरुवातीला लोक लस घेण्याविषयी साशंक होते, त्यानंतर कोणती लस अधिक चांगली आहे याविषयी तर्कवितर्क सुरू झाले, त्यानंतर लशीच्या तुटवड्यावरून गोंधळ सुरू झाला आणि आता कोरोनाच्या दोन वेगवेगळया लसींचे मिक्सिंग करण्याविषयी अनेक प्रकारचे विचारप्रवाह तयार होताना दिसू लागले आहेत. मात्र अशावेळी लोकांनी चुकीच्या माहितीने भुलून न जाता वैद्यकशास्त्रावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे.
लसीकरण हाच नोव्हेल कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळविण्याचा आणि त्याच्याशी सामना करण्याचा मुख्य उपाय आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे आणि अलीकडच्या काळात झालेल्या अनेक संशोधनांच्या निष्कर्षांमधून हीच गोष्ट व्यवस्थित नोंदवलीही गेली आहे. इतकेच नव्हे, तर जगभरात सर्वत्र जाणवत असलेल्या लशींच्या तुटवड्यासंदर्भातील समस्येची उकल शोधण्यासाठी आणि सर्वांना कोरोना विरोधात सर्वोत्तम संरक्षण मिळावे याची खातरजमा करण्यासाठी संशोधक अक्षरश: रात्रीचा दिवस करत आहेत.
जगभरातील पुराव्यांनी उभे केलेले आशादायी चित्र
ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका आणि फायझर-बायोएनटेक या दोन्ही लशी घेतलेल्या लोकांमध्ये सार्स-कोव्ह-२ विषाणूच्या विरोधात रोगप्रतिकारशक्ती सक्रिय करण्याची क्षमता आढळून आल्याचे स्पेन आणि यूकेमध्ये हाती घेण्यात आलेल्या प्राथमिक पाहण्यांमधून असे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात ६०० हून अधिक लोकांवर करण्यात आलेल्या एका चाचणीचे निष्कर्ष १८ मे २०२१ रोजी झालेल्या एका ऑनलाइन सादरीकरणातून जाहीर करण्यात आले. वेगवेगळ्या कोरोनाव्हायरस लसी एकत्र करून देण्याचे फायदे यात प्रथमच मांडण्यात आले. ऑक्सफर्ड विद्यापीठ, द ऑफिस ऑफ नॅशनल स्टॅटिस्टिक्स (ओएनएस) आणि डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड सोशल केअर (डीएचएससी) यांनी हाती घेतलेल्या आणखी एका अभ्यासाच्या निष्कर्षांतही लसींचे मिक्सिंग करण्याचे आशादायी वैद्यकीय परिणाम दिसून आल्याचे नमूद करण्यात आले आहे. १६ वर्षे व त्यापुढील वयाच्या सर्वसामान्य लोकसंख्यागटातील एका मोठ्या समुहातील व्यक्तींमध्ये अँटीबॉडी तयार होण्याच्या दृष्टीने आणि नव्याने संसर्ग होण्याच्या दृष्टीने लसीकरणाचा काय नेमका काय परिणाम होतो हे समजून घेणे या विशिष्ट हेतूने ही पाहणी हाती घेण्यात आली होती. ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका किंवा फायझर-बायोएनटेक यापैकी कोणत्याही एका लसीचा एक डोस घेतल्यानंतर (दुसरा डोस न घेता) २१ दिवसांनंतर कोरोनाच्या संपूर्णतया नव्या संसर्गांचे प्रमाण ६५ टक्क्यांनी, लक्षणांसहितच्या संसर्गाचे प्रमाण ७२ टक्क्यांनी आणि लक्षणांची नोंद न झालेल्या संसर्गाचे प्रमाण ५७ टक्क्यांनी घटल्याचे या अभ्यासातून दिसून आले.
त्याचप्रमाणे लसीकरणामुळे आजाराची साथ पसरण्याचा धोकाही कमी होत असल्याचे आढळून आल्याचे medRxiv* मध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासामध्ये अधोरेखित करण्यात आले आहे. लोकांमध्ये अपेक्षित रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी वेगवेगळ्या लसींचे मिक्सिंग करणे व त्यांचे कॉकटेल करणे उपयुक्त ठरत असल्याचे या सर्वच अभ्यासांमधून अधोरेखित करण्यात आले आहे तसेच या लसीकरणामुळे विषाणूच्या बहुतांश व्हेरियंट्स ऑफ कन्सर्न्स (व्हीओसी) अर्थात चिंताजनक उपप्रकारांविरोधात संरक्षण मिळत असल्याचेही या पाहण्यांच्या निष्कर्षांत नमूद करण्यात आले आहे.
भारतातील चित्र : अद्याप पुरावे हाताशी आलेले नाहीत
जगाच्या इतर भागांमधून हाती आलेल्या आशादायी पुराव्यांना विचारात घेत आपले भारतीय संशोधकही देशासाठी अधिक पुरावे शोधण्याचा प्रयत्न सुरू करू शकतील. दोन वेगवेगळ्या लसींचे डोस एकत्रितपणे घेण्याच्या पद्धतीची सुरक्षितता तपासण्यासाठी इथले वैज्ञानिक आणि संशोधक चाचण्या सुरू करत आहेत का हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे (सध्या देशामध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये या गोष्टीला वैधता देण्यात आली आहे). आणखी पुढे येऊन अद्याप भारतात येण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लसींचाही या चाचण्यांमध्ये समावेश करून घेतला जाऊ शकेल. मात्र या चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध होईपर्यंत लसीकरण थांबवून ठेवण्याची गरज नाही; आपली पाळी आली की लस घेऊन टाकायला हवी.
अफवांवर विश्वास ठेऊ नका, आपल्या डॉक्टरांशी बोला
सध्या आपण एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे, ती म्हणजे दोन लसींचे मिक्सिंग करण्याविषयीची संशोधने अद्याप सुरू असताना, त्यातून सकारात्मक परिणाम हाती येण्याची चांगली शक्यता आहे हे खरे आहे, मात्र हानीकारक परिणामांची शक्यताही पूर्णपणे नाकारता येणार नाही. हा अद्याप न सुटलेला वैज्ञानिक प्रश्न आहे ज्याचा उलगडा येत्या काळामध्ये होईल. मात्र त्यामुळे अस्वस्थ होण्याची किंवा अकारण चुकीचे समज करून घेण्याची गरज नाही. हा विज्ञानासमोरचा एक न सुटलेला प्रश्न आहे आणि विज्ञानच त्यावरील उकल शोधून काढेल. तेव्हा अफवांवर विश्वास ठेऊ नका, आपल्या डॉक्टरांशी बोला आणि आपल्या शंकांचे समाधान करून घ्या.
लक्षात ठेवा, लसीचा एकच डोसही १२ आठवड्यांपर्यंत रोगप्रतिकारशक्ती पुरवू शकतो हे अभ्यासांमधून सिद्ध झालेले आहे. तेव्हा प्रत्येकाने आपल्या पहिल्या डोससाठी नावनोंदणी करावी व ज्यांनी आधीच पहिला डोस घेतला आहे त्यांनी दुसऱ्या डोससाठी आपली पाळी येईपर्यंत प्रतीक्षा करावी.
(डॉ. राहुल पंडित हे फोर्टिस हॉस्पिटल, मुंबई येथील क्रिटिकल केअर विभागाचे संचालक व महाराष्ट्राच्या कोरोना टास्कफोर्सचे सदस्य आहेत.)