मुक्तपीठ टीम
आगामी प्रजासत्ताक दिनी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारासाठी ऑनलाईन नामांकने/शिफारशींची सुरुवात झाली आहे. ही नामांकने दाखल करण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२१ आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकने/शिफारशी पद्म पुरस्कारांच्या https://padmaawards.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन दाखल करता येतील.
पद्म पुरस्कारांविषयी माहिती
• १९५४पासून सुरू झालेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनी केली जाते. उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सन्मान करण्याचा या पुरस्कारांचा उद्देश आहे.
• कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यकशास्त्र, सामाजिक कार्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग इत्यादी सर्व क्षेत्रे/प्रकार यामध्ये उल्लेखनीय आणि असाधारण कामगिरीसाठी हे पुरस्कार देण्यात येतात.
• समुदाय, व्यवसाय, पत किंवा लिंग याबाबत कोणताही भेदभाव न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत.
• सार्वजनिक उपक्रमातील डॉक्टर आणि वैज्ञानिक वगळता, सार्वजनिक उपक्रमांमध्ये काम करणारे सरकारी कर्मचारी या पद्म पुरस्कारांसाठी पात्र नाहीत.
पद्म पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
• या नामांकनांमध्ये/शिफारशींमध्ये वर उल्लेख केलेल्या पद्म पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यात सर्व तपशील समाविष्ट असला पाहिजे.
• शिफारस केलेल्या व्यक्तीच्या संबंधित क्षेत्र/प्रकारात उल्लेखनीय आणि असामान्य कामगिरीची माहिती या तपशीलामध्ये जास्तीत जास्त ८०० शब्दांमध्ये कथन केलेली असली पाहिजे.
पद्म पुरस्कारांचे जनतेच्या पद्म पुरस्कारांमध्ये रुपांतर करण्याचा प्रयत्न
• पद्म पुरस्कारांचे जनतेच्या पद्म पुरस्कारांमध्ये रुपांतर करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. म्हणूनच या पुरस्कारांसाठी आपल्या स्वतःच्या नामांकनासह नामांकने/ शिफारशी पाठवाव्यात अशी विनंती सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.
• महिला, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती आणि जमाती, दिव्यांग व्यक्ती आणि समाजाची नि:स्वार्थ सेवा करणाऱ्यांमधून खऱ्या अर्थाने सर्वोत्तम आणि असामान्य कामगिरी करणाऱ्या प्रतिभावान व्यक्तींची निवड करण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जावेत.