शेतमालाच्या सर्व समावेशक मुल्य साखळ्यांचा विकास करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे. या योजनेतून राज्यातील सर्व विभागांना प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे अशा सूचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत कृषीमंत्र्यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरजकुमार, उपसचिव सुशिल खोडवेकर आदी यावेळी उपस्थित होते.
या प्रकल्पासाठी अर्ज करण्याकरिता पोर्टल सुरु करण्यात आले होते. त्यानुसार ११ हजार ५८४ लोकांनी नोंदणी केली असून ५ हजार ७६४ संस्थांनी अर्ज सादर केले आहेत. यामध्ये सुमारे २ हजार शेतकरी उत्पादक कंपन्या असून २ हजार ८३३ आत्मा नोंदणीकृत गट आहेत. महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील प्रभाग संघांचे ७१० तर माविमच्या लोकसंचालित साधन केंद्राचे २६२ अर्ज प्राप्त झाले आहेत.
शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पातून विकेल ते पिकेल अभियान सुरु करण्यात आले असून या अंतर्गत या प्रकल्पाच्या माध्यमातून मुल्य साखळ्यांचा विकास सुरु केला जाणार आहे, असे कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले. यावेळी प्रकल्पांतर्गत केल्या जाणाऱ्या विविध कामासंदर्भात सादरीकरण करण्यात आले.