मुक्तपीठ टीम
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने १ जुलै रोजी साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखाना सील केला असून, कारखाना खरेदीसाठी कर्ज दिलेल्या बँकांनाही नोटिस पाठवली आहे. ईडीने मनी लॉड्रिंगप्रकरणी तपास सुरू केला आहे. अजित आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्या संबंधित कारखाना सील केल्यानंतर आता कारखान्यास मिळालेल्या ७५० कोटी रुपयांच्या कर्जाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. साखर कारखान्यास हे कर्ज चार सहकारी बँकांनी दिले आहे. सहकारी बँकांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या अजित पवारांचा संबंध असल्याने ईडीचा रोख त्यांच्या दिशेनेच असल्याची चर्चा आहे.
ईडीचा रोख अजित पवारांकडेच?
- ईडीने ज्या चार बँकांना नोटिस पाठविल्या आहेत त्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा समावेश असून त्यामध्ये पवार स्वत: संचालक आहेत.
- जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना (एसएसके) यांना चार बँकांनी दिलेल्या ७५० कोटी रुपयांची ईडी चौकशी करीत आहे.
- ईडी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत झालेल्या २५ हजार कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांचीही चौकशी करत आहे.
- त्यावेळी अजित पवार हे राज्य बँकेचे अध्यक्ष होते. त्यामुळे पुन्हा ईडीच्या तपासाचा रोख अजित पवारांच्या दिशेने दिसत आहे.
साखर कारखाना, जिल्हा बँका आणि अजित पवार
- जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना गुरु कमोडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने विकत घेतला.
- जरंडेश्वर कारखाना पुढे जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडला भाडेपट्ट्यावर दिला.
- कारखाना खरेदीसाठी वापरण्यात येणाऱ्या निधीचा काही भाग स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेडकडून आला.
- ईडीच्या म्हणण्यानुसार ही कंपनी पवार आणि त्यांच्या पत्नीशीही संबंधित आहे.
- जरंडेश्वर कारखान्याचे खरे नियंत्रण या कंपनीच्या ताब्यात होते.
- भाडेपट्टीवर घेतल्यानंतर एका महिन्यातच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (ज्यात पवार हे संचालक देखील आहेत) यांनी जरंडेश्वर कारखान्याला १०० कोटींचे कर्ज जाहीर केले.
- काही वर्षानंतर पुणे जिल्हा आणि इतर बँकांनी जरंडेश्वर एसएसकेला ६५० कोटींची अतिरिक्त रक्कम दिली.
- अजित पवारांशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंधित असलेल्या बँकांनी अजित पवारांशी संबंधित साखर कारखान्याला दिलेले ७५० कोटी पुढे कुठे आणि कसे गेले त्याचा ईडी तपास करत आहे.
सातारा जिल्हा बँकेकडून नोटिस नाही तर फक्त माहिती मागितल्याचा दावा
- सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सरव्यवस्थापक यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या बँकेने जरंडेश्वर साखर कारखान्याला दिलेले कर्ज हे योग्य प्रक्रियेनुसारच आहे.
- बँकेने २३७ कोटी ६० लाखांचे कर्ज मंजूर केले होते.
- त्यापैकी १२९ कोटी ९८ लाख रुपयांचे कर्ज प्रत्यक्षात देण्यात आले.
- दिलेल्या कर्जापैकी ३१ कोटी ६० लाख रुपयांच्या कर्जाची परतफेड झाली आहे.
- ९७ कोटी ३८ लाख रुपयांचे कर्ज कारखान्याकडे येणे आहे.