मुक्तपीठ टीम
ओबीसी आरक्षणासंदर्भात अभ्यासूपणे भूमिका मांडणारे प्रा. हरी नरके यांनी गेले काही दिवस ओबीसी राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याविरोधात जनजागृतीसाठी प्रयत्न चालवले आहेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण हे ठाकरे-पवारांच्या सत्तेत गेले असले तरी त्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार असल्याची त्यांनी मांडलेली भूमिका ही वादाचा विषय ठरली आहे.
त्यातच माध्यमांशी बोलताना नाव न घेता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रा. हरी नरके यांचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असा केल्याने वाद चिघळू लागला आहे. आता डॉ. हरी नरके यांनी दहा प्रश्न विचारत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर जाहीर चर्चा करण्याचे ओपन चॅलेंज केले आहे.
प्रा. हरी नरके यांचे देवेंद्र फडणवीसांना दहा प्रश्न
(१) केंद्राचा डेटा मागू नका म्हणता तर तुम्ही स्वतः १/८/२०१९ ला केंद्राकडे का मागितला होता?
(२) तुमच्या ग्रामविकास मंत्र्यांनी ८ आठवड्यात आम्हाला सर्वोच्च न्यायालयाला माहिती द्यायचीय,तरी त्वरा करा असे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना लिहिले होते. तुम्ही आठ आठवड्यात ही माहिती न्यायालयाला दिली नाही म्हणून आरक्षण गेले. हे पाप तुमचेच नाही का?
(३) जी माहिती २०१६ मध्ये मोदी सरकारने बॅन केली तिची पावती तुम्ही काँग्रेस सरकारवर का फाडता?
(४) त्या माहितीत८कोटी चुका असल्याचा जावईशोध तुम्ही कसा लावला? केंद्र सरकारने तुम्हाला डझनावारी पत्रे लिहिली त्यात तर एकाही चुकीचा उल्लेख नाही,मग हा डेटा न बघताच तुम्हाला ८ कोटी चुका असल्याचा भास झाला का?
(५) तुमच्या मातृसंस्थेने जातगणनेला लेखी विरोध केला होता(२४/५/२०१०)म्हणून तीत चुका असल्याचा डंका तुम्ही पिटताय. याला कोल्ह्याला द्राक्षे आंबट म्हणायचं का?
(६) सत्तेवर आलो तर ३ महिन्यात डेटा जमवता येतो म्हणता, तर ६० महिने काय केले?
(७) डेटात चुका होत्या तर मोदी सरकारने नवा, बिनचूक obc डेटा गेल्या ७ वर्षात का जमवला नाही?
(८) न्या. रोहिणी आयोगाला डेटा दिला नाही म्हणता, मग ज्यांच्या ताब्यात तो आहे त्या RGI ना या आयोगात सदस्य कशासाठी नेमलंय? (९) केंद्र सरकार एकही चूक असल्याचे सांगत नसताना तुम्हाला ८ कोटी चुका कशा कळल्या?
(१०) आरक्षणमुक्त भारताचे तुम्ही पाईक असताना बहुजनांच्या बुद्धीभेदासाठी शब्दच्छल करण्याचा उद्योग का करताय?
“करता का आमने सामने चर्चा? ओपन चॅलेंज करतो, आहे हिंमत?
हे सर्व प्रश्न मी जाहीरपणे समाज माध्यमे व वाहिन्यांवरून तुम्हालाच विचारलेत,जाहीर उत्तरे द्या,पळ काढू नका”, असेही प्रा. हरी नरके यांनी म्हटले आहे.