मुक्तपीठ टीम
जिद्द असेल तर अशक्य काही नसतं. त्यात पुन्हा त्यासाठी सतत, अथक परिश्रम घेतलं तर अवघड कामही सोपं वाटतं. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अंबरनाथच्या सिलिंडर मॅनचंच पाहा. त्यांचे फोटो गेल्या २ दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सागर जाधव असं या सिलिंडर मॅनचं नाव आहे. तो एका गॅस एजेंसीसाठी सिलिंडरची डिलिव्हरी करतो. फोटो व्हायरल झाल्या नंतर सागरचं नाव अंबरनाथमध्ये ज्याच्या त्याच्या तोंडी आहे. पण त्याला आता बाहेरही प्रसिद्धी मिळत आहे.
छायाचित्रानं बदललं जग
अंबरनाथच्या लक्ष्मी नगर भागात राहणारा सागर जाधव हा गेल्या १२ वर्षांपासून घरोघरी गॅस सिलिंडर्सची डिलिव्हरी करतो. २ दिवसांपूर्वी सागर हा अंबरनाथ स्टेशन परिसरात सिलिंडरच्या गाडीजवळ उभा असताना अंबरनाथच्याच तुषार भामरे या तरुणाने त्याची देहयष्टी पाहून त्याचे फोटो काढले आणि सागरच्या नकळत फेसबुकवर टाकले. “एखाद्या वेबसिरीजमधलं पात्र शोभावं, असा हा सिलिंडर मॅन..” अगदी सहज शब्द वापरत फोटो तुषारने फेसबुकवर टाकले आणि हे फोटो इतका व्हायरल झाला की, वेबसिरीजच्या कास्टिंग डायरेक्टर्स पासून ते निर्मात्यांपर्यंत सगळ्यांनीच सागरचं कौतुक केलं. अन सागर रातोरात व्हायरल सोशल मीडिया स्टार बनला.
Trust me the #cylinderman has potential to take the #bharatgas brand to whole new level. pic.twitter.com/pMlfFHYOAq
— TusharBhamre (@tusharbhamre) June 27, 2021
सागर जाधव – काडी पैलवान ते बॉडी बिल्डर!
• सागर जाधव हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील.
• १२ वी पर्यंत शिकलेल्या सागरचं बालपण आणि शिक्षण नाशिक जिल्ह्यातच झालं.
• आई वडिलांचं छत्र हरपलेल्या सागरनं १२ वी नंतर अंबरनाथला काका काकूंकडे येऊन नोकरीचा शोध सुरू केला.
• तो राहत असलेल्या लक्ष्मीनगर परिसरातच भारत गॅसची एजेन्सी असलेल्या राणू गॅस कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो.
• याचठिकाणी १२ वर्षांपासून सागर नोकरी करतोय.
• नोकरी सुरु केली तेव्हा तो खूपच सडपातळ होता.
• त्यावेळी सागरला ३० किलोचा सिलिंडर उचलायचा तर आपण ४५ किलोचं असून कसं चालेल? असा प्रश्न पडला.
• त्यानंतर त्याने मागच्या ३ वर्षांपासूनच जिममध्ये जाऊन शरीरयष्टी कमवायला सुरुवात केली.
• सतत परिश्रम, पुन्हा दिवसभर सिलिंडर उचलायचं काम यामुळे त्याचं शरीर आकार घेऊ लागलं.
• पुर्वी ज्यांनी त्याला पाहिलं तर तो पूर्वीचा सडपातळ काडी पैलवान जुना सागर नक्की हाच होता का? असा प्रश्न पडतो.
सागर झाला व्हायरल सोशल मीडिया स्टार!
• खांद्यावर सिलिंडर घेतलेला सागर हा जणू बाहुबलीच वाटतो, असं लोक म्हणतात..
• सागरच्या घरी त्याचे काका-काकू, भाऊ आणि पत्नी असा परिवार आहे.
• अतिशय मेहनत करून, ४-४ मजले सिलिंडर खांद्यावर घेऊन चढून सागर त्याचं घर चालवतो.
• पण आयुष्य एका रेषेत चाललं असताना अचानक असं काही तरी होईल, आणि आयुष्य एका रात्रीचं इतकं बदलेल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, असं सागर नम्रपणे सांगतो.
• सागर आता जिथे सिलिंडरची डिलिव्हरी द्यायला जाईल, तिथले लोकही उत्सुकतेनं आपल्याकडे पाहात असल्याचं सागर सांगतो.
सागरला लाभलेल्या प्रसिद्धीचं सर्वांना कौतुक
• सागरनं खूप पुढे जावं आणि नाव कमवावं, असं त्याच्या मित्रांना वाटतं.
• सागर हा आता सोशल मीडियावरचा सेलिब्रिटी बनला आहे.
• पण तरीही त्याचे पाय मात्र जमिनीवरच आहेत.
• एखाद्या वेब सिरीजची किंवा जाहिरातीची ऑफर आलीच तर ती करायला नक्कीच आवडेल, असं तो सांगतो.
• पण त्याचवेळी सिलिंडर मॅन हीच आपली खरी ओळख असल्याचंही तो नमूद करतो.
• अंबरनाथचा हा सिलिंडर मॅन लवकरच एखाद्या जाहिरातीत किंवा सिरीयल, वेब सिरीज यात दिसला पाहिजे. तुम्हीही त्याची शिफारस नक्की करा.
मुक्तपीठ टीमच्या सागर शिंदेला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!