मुक्तपीठ टीम
केंद्रातील मोदी सरकारने कृत्रिम महागाई निर्माण करून सामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या कमकुवत केले आहे. या सामान्य माणसाच्या वेदना दिल्लीच्या सरकारपर्यंत पोहवण्यासाठी तसेच सामान्य जनतेच्या हक्कासाठी ऊन पावसाची तमा न बाळगता काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस व जिवनावश्यक वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढवल्याने सर्व प्रकारची महागाई वाढली असून लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. सरकारचे अपयश झाकण्यासाठी मंत्रीमंडळातील चेहरे बदलून चालणार नाही तर पंतप्रधानच बदलण्याची गरज आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
इंधन दरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसने आज राज्यातील सर्व महसुली आयुक्त मुख्यालयाच्या ठिकाणी सायकल रॅली काढून मोदी सरकारचा निषेध केला. नागपुरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात सायकल यात्रा काढण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नागूपर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, नागपूर काँग्रेसचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे, माजी मंत्री अनिस अहमद, आ. अभिजित वंजारी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पटोले पुढे म्हणाले की, केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे जुलमी, अत्याचारी सरकारमुळे जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. शेजारच्या देशात भारत ३० रुपयांनी पेट्रोल व २२ रुपयांनी डिझेल देते आणि आपल्याच लोकांना १०० रुपयांना का? हे अन्यायी मोदी सरकार उखडून फेकण्यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून सामान्य जनतेसाठी संघर्ष करत आहे.
नवी मुंबईमध्ये शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, मत्ससंवर्धन मंत्री अस्लम शेख, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते राजेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सायकल यात्रा काढण्यात आली.
पुण्यात प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर कँप ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष व माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, संजय बालगुडे, प्रदेश प्रवक्ते गोपाल तिवारी. जेष्ठ्या नेत्या कमलताई व्यवहारे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
औरंगाबाद येथे शहर जिल्हा अध्यक्ष हिशाम उस्मानी, औरंगाबाद जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण काळे, माजी मंत्री अनिल पटेल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात उंट, बैलगाडी आणि घोड्यांचाही सहभाग होता.
नाशिकमध्ये प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ. सुधीर तांबे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महागाई विरोधातील काँग्रेसच्या १० दिवसांच्या आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात उद्या शुक्रवारी प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. पुण्यातील आंदोलनात उद्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही सहभागी होणार आहेत.