मुक्तपीठ टीम
अधिवेशनातील चर्चेदरम्यान भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानावरून काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला. भाजपाचे आमदार काय धमकी देत आहेत का? सभागृहात धमकी दिली जात आहे, काय सुरु आहे, असा संताप सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला.
सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना नाना पटोले म्हणाले की, सभागृहाचे कामकाज सुरु असताना सत्ताधारी पक्षाचे सदस्य बोलू लागताच भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. विधिमंडळात मध्येच बोलले म्हणून अनिल देशमुख आता आतमध्ये जात आहेत हे मुनगंटीवार यांचे वक्तव्य धमकी देणारे आहे. सभागृहातच धमकी देण्यापर्यंत मजल भाजपाची गेली आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून ईडी, आयकर, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजपा विरोधी पक्षांच्या लोकांना नाहक त्रास देत असल्याची ही कबुलीच आहे. हा सत्तेचा दुरुपयोग असून महाराष्ट्रात हा खेळ केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून भाजपाने चालवला आहे हे लोकशाहीला घातक आहे, असे नाना पटोले म्हणाले.