मुक्तपीठ टीम
राज्यात गेल्या दीड वर्षापासून कोरोना रोखण्यासाठी दिवसरात्र काम करताना २२८ मनपा कर्मचाऱ्यांना आपला जीव कोरोनामुळे गमवावा लागला आहे. आता या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना मुंबई मनपाने मदतीचा हात पुढे केला आहे. मुंबई मनपाकडून ९१ जणांच्या कुटुंबांना ५० लाखांची आर्थिक मदत तर ९० जणांच्या वारसांना नोकरीही दिली जाणार आहे. कोरोनामध्ये आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या मृत कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडूनही आर्थिक मदत करण्यात येते. मुंबई मनपाने आर्थिक मदतीसाठी २०० प्रस्ताव केंद्राकडेही पाठवले होते, पण त्यातील केवळ १९ प्रकरणांत केंद्राने ५० लाखांची मदत दिली आहे. त्यामुळे उरलेल्यांना मुंबई मनपानेच मदत केली आहे.
मुंबईकरांसाठी लढताना मनपालाही कोरोनाचा फटका
- गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव सुरु झाला.
- यानंतर काही दिवसांतच रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली.
- मनपाचे एकूण १ लाख दहा हजार कर्मचारी आहेत.
- त्यातील ६७६६ कर्मचाऱ्यांना दीड वर्षात कोरोनाची लागण झाली.
- यातील तब्बल ५८०३ कर्मचारी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या कर्तव्यावर हजर झाले आहेत.
- कोरोनाच्या पहिल्या लाटेत मनपाच्या १९८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
- दरम्यान मनपाचे ९६७ कर्मचारी कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
केंद्राकडून २००पैकी फक्त १९ प्रकरणात आर्थिक मदत
- २२८ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
- कोरोनामध्ये आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या मृत कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडूनही आर्थिक मदत करण्यात येते.
- मनपाने आर्थिक मदतीसाठी २०० प्रस्ताव केंद्राकडेही पाठवले होते.
- मात्र यातील केवळ १९ प्रकरणांत केंद्राने ५० लाखांची मदत दिली आहे.
- तर इतर कुटुंबांना आधार देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही मनपाकडून मदत
- कोरोना कामासाठी अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली.
- शिवाय मनपाचे शेकडो कंत्राटी कर्मचारीही आहेत.
- यामध्ये कोरोनामध्ये काम करताना ९ कंत्राटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे.
- यामध्ये कंत्राटी कामगार मृत्यू झालेले ३ प्रस्तावही केंद्राने मंजूर केले आहेत.
- तर उर्वरित सहा कर्मचाऱ्यांना मनपा आर्थिक मदत देणार आहे, अशी माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली.