मुक्तपीठ टीम
‘ई-संजीवनी’ या केंद्र सरकारच्या मोफत टेलीमेडिसिन सेवेने खूप मोठी कामगिरी बजावली आहे. आतापर्यंत या सेवेमुळे ७० लाख रुग्णांना ऑनलाईन वैद्यकीय सल्ला मिळाला आहे. जून महिन्यात या सेवेचा देसभरातील साडेबारा लाख रुग्णांनी लाभ घेतलाय. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ही सेवा सुरु झाल्यापासूनची सर्वाधिक लाभार्थी संख्या आहे. सध्या ही राष्ट्रीय टेलीमेडीसीन सेवा ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहे.
ई-संजीवनीचं काम कसं चालतं?
• ई संजीवनी हा एक टेलिमेडीसीन प्लॅटफॉर्म आहे.
• त्याची अंमलबजावणी २१ हजार आरोग्य आणि निरामयता केंद्रामधून केली जाते. त्यासाठी स्पोक्ससारखी म्हणजे एका केंद्रापासून अनेक ठिकाणी या पद्धतीची रचना आहे.
• तसेच तीस राज्यांमध्ये जिल्हा रूग्णालाये आणि वैद्यकीय महाविद्यालयात त्याची १९०० केंद्रे आहेत.
• डॉक्टर ते डॉक्टर टेलिमेडीसीन प्लॅटफॉर्मवरून आतापर्यंत 32 लाख रुग्णांपेक्षा सेवा मिळाली आहे.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ई-संजीवनी OPD म्हणजेच बाह्य रुग्ण विभाग सेवेची सुरुवात केली होती. ई-संजीवनी OPD वरून ४२० ऑनलाईन OPD चालवल्या जातात. त्याचबरोबर स्पेशालिटी आणि सुपर-स्पेशालिटी ओपीडी देखील चालवल्या जातात. पाच राज्यांतल्या एम्ससारख्या मोठ्या रूग्णालयांद्वारे या सेवा दिल्या जातात. गेल्या दोन आठवड्यात, ५० हजारांपेक्षा जास्त रूग्णांनी ई-संजीवनी सेवांचा लाभ घेतला असून दोन हजार डॉक्टर्स रोज ही सेवा देत असतात. संरक्षण मंत्रालयाने देखील ई-संजीवनी OPD सेवा सुरु केली आहे, ज्यावर संरक्षण सेवांशी संबंधित शंभर ज्येष्ठ डॉक्टर्स आणि विशेषज्ञ देशभरातील रूग्णांना ही सेवा देत असतात.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय या राष्ट्रीय टेलिमेडीसीन सेवेला अधिकाधिक अद्ययावत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. गेल्या महिन्यात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने इलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि मोहालीतील C-DAC च्या समन्वयाने ई-संजीवनी सेवा देशातील सामाईक सेवा केंद्रातून मोफत दिली जाण्याची तांत्रिक व्यवस्था केली. एक जुलै रोजी, सहाव्या डिजिटल इंडिया उपक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई-संजीवनी सेवेचे कौतुक केले. तसेच बिहारमधल्या पूर्व चंपारण येथील ई-संजीवनी योजनेच्या लाभार्थ्याशी संवाद साधला. हा लाभार्थी आपल्या लखनौ इथल्या आजारी आजीसाठी वृद्धापकाळाने होणारे आजार आणि मानसिक आजारांवर ई-संजीवनी उपचार सेवेचा लाभ घेत आहे.
अगदी अल्पावधीतच, केंद्र सरकारच्या राष्ट्रीय टेलिमेडिसिन सेवेने एकूणच भारतीय आरोग्य सेवेला मोठी मदत केली आहे. या व्यापक सेवेमुळे शहरी आणि ग्रामीण भागातील डिजिटल दरी कमी होण्यासही मदत झाली आहे. राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाशी सुसंगत, अशा ई-संजीवनी सेवेमुळे डिजिटल आरोग्य अर्थव्यवस्थेला चालना मिळते आहे.
ई-संजीवनी ही सेवा अँड्रोईड ॲपवर उपलब्ध आहे.https://esanjeevaniopd.in/