मुक्तपीठ टीम
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची मागणी महाराष्ट्रातील खासगी कारखानदार कम राजकीय नेत्यांची झोप उडवणारी ठरत असण्याची शक्यता आहे. सहकारी साखर कारखान्यांची कवडीमोलानं विक्री करण्याविरोधात लढणारे शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी ईडी सीबीआय़ या यंत्रणा राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी वापरल्या जात असल्याचा आऱोप केला. मात्र, त्याचवेळी त्यांनी केवळ जरंडेश्वर न थांबता आम्ही मागणी केल्याप्रमाणे सर्व ४३ सहकारी साखर कारखान्यांच्या विक्री व्यवहारांची चौकशीची मागणी केली आहे. तसेच नंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही जाहीर केलं.
सातारच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावरील ईडीच्या जप्ती कारवाईनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. त्या कारखान्यातील कारवाईशी आपला काही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला असला तरी भाजपाचे नेते आक्रमक भूमिकेत आहेत. गेल्या दीड दशकात महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या अनेक साखर कारखान्यांना राज्य बँकेकडून लिलावात खूप कमी किंमतीत खरेदी केले. तोट्यामुळे लिलाव झालेले त्या साखर कारखान्यांपैकी अनेक कारखाने राजकीय नेत्यांच्या मालकीचे खासगी झाल्यापासून चांगले चालत आहेत, हे विशेष. अर्थात तेथे त्यांच्या उभारणीपेक्षा खरेदीसाठी लागलेले अतिशय कमी भांडवल हेही असल्याचं सांगितलं जातं. राजू शेट्टी, अण्णा हजारे, शालिनीताई पाटील यांच्यासारख्या अनेक सामाजिक राजकीय नेत्यांनी अशा व्यवहारांवर आक्षेप घेत कारवाईची मागणी केली होती. अण्णा हजारेंनी तर न्यायालयातही लढा दिला आहे.
सातारच्या जरंडेश्वरवरील जप्ती कारवाई ही विकत घेणाऱ्या कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहारांमुळे झाल्याचा दावा आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे. मात्र, तसे असले तरीही भाजपाच्या नेत्यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे.
ब्लॅकमेलिंगसाठी नको, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कारवाई करा!
- शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे.
- ईडी-सीबीआय केंद्राच्या हातात, त्यांचा वापर राजकीय ब्लॅकमेलिंगसाठी केला जातो आहे.
- केवळ जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई करून भागणार नाही.
- राज्यातील ४३ कारखान्यांच्या विक्रीची चौकशी झालीच पाहिजे. राजकीय फायद्यासाठी एखाद्या कारखान्याची चौकशी लावायची आणि त्यांना भाजपात घ्यायचे, ही पद्धत चूक आहे.
- कारण, हे कारखाने शेतकऱ्यांचे आहेत.
सर्वपक्षीय नेत्यांचे सहकारी कारखानदारीवर दरोडे
- सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून साखर कारखान्यांवर दरोडे घातले आहेत. ईडीकडे पाच वर्षे फेऱ्या मारल्या.
- ४३ कारखान्यांची यादी हवी असेल तर पुन्हा देतो.
- ईडी एकप्रकारे राजकीयदृष्ट्या काम करत आहे.
- अनेकदा मी ईडीकडे खेटे घातले.
- पाच वर्षांपूर्वी पुरावे दिले होते.
- मात्र, आता ही कारवाई करण्यात आली आहे.
- याचा अर्थ ईडीला कुणीतरी सांगत आहे, अमूक अमूक माणूस त्रासदायक ठरतो, म्हणून त्याचा काटा काढायचा आहे, असा गंभीर आरोपही शेट्टी यांनी केला आहे.